scorecardresearch

मध्य रेल्वेवर उद्या ‘मेगा ब्लॉक’

मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यानच्या दोन्ही जलद मार्गावर तसेच हार्बरच्या कुर्ला – वाशीदरम्यानच्या दोन्ही मार्गावर रविवारी (९ ऑक्टोबर) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर उद्या ‘मेगा ब्लॉक’
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

मुंबई : मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यानच्या दोन्ही जलद मार्गावर तसेच हार्बरच्या कुर्ला – वाशीदरम्यानच्या दोन्ही मार्गावर रविवारी (९ ऑक्टोबर) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल विलंबाने धावतील. पश्चिम रेल्वेवर मात्र शनिवारी रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून रविवारी ब्लॉक नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. 

मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याणदरम्यानच्या दोन्ही जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० या काळात ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी ९. ३० ते दुपारी पावणे ३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद, तसेच अर्ध जलद लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर चालवण्यात येतील.  हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत सीएसएमटी येथून पनवेल, बेलापूर, वाशीच्या दिशेने जाणारी लोकल सेवा आणि वाशी, बेलापूर, पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या