मुंबई: विविध कामांसाठी रविवारी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमधून पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण व त्यापुढील प्रवाशांची सुटका झाली आहे. मध्य रेल्वे मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेऊन कामे केली जाणार आहेत. मात्र हार्बरवर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवर २१ मेच्या मध्यरात्री १२ ते पहाटे ४ पर्यंत गोरेगाव ते सांताक्रूझदरम्यान चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर आणि विरारच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० पर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

मध्य रेल्वेच्याही भायखळा ते माटुंगा अप जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.३० ते पहाटे ४.३० पर्यंत आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री १२.४० ते पहाटे ५.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. रविवारी मुख्य मार्गावर ब्लॉक होणार नाही. हार्बरवर मात्र येत्या रविवारी पनवेल ते वाशी दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक होणार आहे. सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत ब्लॉक होणार असून त्यामुळे पनवेल ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते पनवेल, बेलापूपर्यंतच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ठाणे ते पनवेल ते ठाणे ट्रान्स हार्बरवरील लोकल फेऱ्याही ब्लॉक वेळेत रद्द असतील. मात्र ठाणे ते वाशी ते ठाणे आणि नेरुळ लोकल फेऱ्या तसेच बेलापूर, नेरुळ ते खारकोपर लोकल फेऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जातील.

  • येत्या रविवारी पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते वानगावदरम्यान पुलाच्या कामासाठी सकाळी ७ ते दुपारी ३ अप मार्गावर आणि डाऊन मार्गावर दुपारी १२.२० ते १.२० असा ब्लॉक असणार आहे. यामुळे ७० मेल, एक्स्प्रेस, मेमू आणि चर्चगेट ते डहाणू लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
  • यामध्ये १४ मेल, एक्स्प्रेस, मेमू, लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. बोरिवली ते डहाणू, विरार ते डहाणू, डहाणू ते दादर आणि डहाणू ते चर्चगेट अशा चार लोकल फेऱ्या रद्द केल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. तसेच सुरत एक्स्प्रेस, अजमेर एक्स्प्रेसही रद्द केली आहे. तर ५६ मेल, एक्स्प्रेस, मेमू, चर्चगेट ते डहाणू लोकलच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत.