रेल्वेमार्गावर महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामे करण्यासाठी आज, रविवारी मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते कल्याण या दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर, कुर्ला ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अप हार्बर मार्गावर आणि वडाळा रोड ते माहीम डाऊन व अप हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे काही फेऱ्या रद्द होणार असून मध्य व हार्बर मार्गाची वाहतूक उशिराने सुरू असेल. पश्चिम रेल्वेवर मात्र रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.
मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण या स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३.३० या दरम्यान मेगाब्लॉक असेल. त्यामुळे मुलुंडहून १०.३९ ते ३.२२ या दरम्यान कल्याणच्या दिशेने रवाना होणाऱ्या सर्व धीम्या व अर्धजलद गाडय़ा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाडय़ा कळवा, मुंब्रा दिवा, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकांवर थांबणार नाहीत. या स्थानकांवरील प्रवाशांना ठाणे, कल्याण आणि डोंबिवली स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
त्याशिवाय सकाळी १०.०८ ते दुपारी २.४० या दरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणाऱ्या सर्व जलद गाडय़ा घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील. ठाण्याहून १०.५० ते ३.३६ या दरम्यान सुटणाऱ्या सर्व जलद गाडय़ाही या सर्व स्थानकांवर थांबतील. तसेच या गाडय़ा आपल्या वेळापत्रकापेक्षा १५-२० मिनिटे उशिराने धावतील.
कुर्ला ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अप हार्बर मार्गावर आणि वडाळा रोड ते माहीम डाउन व अप हार्बर मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० या दरम्यान मेगाब्लॉकची कामे सुरू असतील. या कालावधीत मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते अंधेरी या मार्गावरील सर्व गाडय़ा सकाळी १०.२० ते ३.३३ या काळात बंद असतील. तर ११.०८ ते ३.२० या दरम्यान कुल्र्याहून निघणाऱ्या अप हार्बर गाडय़ा मुख्य मार्गाच्या जलद मार्गावरून धावतील. या गाडय़ा शीव, माटुंगा, दादर, परळ या स्थानकांवर थांबतील. पश्चिम रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार नसला, तरी शनिवार-रविवारच्या रात्री वसई रोड ते वैतरणा या स्थानकांदरम्यान अभियांत्रिकी कामे करण्यात येणार आहेत. मात्र त्यामुळे उपनगरीय गाडय़ांच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही.