लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी, अनेक प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करू लागले आहेत. यात महिलांची संख्या अधिक आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलच्या महिलांच्या डब्यातून पुरूष प्रवास करू लागले आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महिलांचा प्रवास सुरक्षित आणि लोकल प्रवासातील गैरसोय टाळण्यासाठी महिलांसाठी काही डबे राखीव ठेवले आहेत. तसेच वातानुकूलित लोकलचे काही डबे राखीव ठेवण्यात आले आहेत. वातानुकूलित लोकलचे डबे एकमेकांना जोडले असल्याने, एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येते. महिलांचा डबा जोडून असल्याने त्यात पुरुष प्रवासी ये-जा करीत असतात. महिलांचा डबा हा प्रथम डबा असल्याने अनेक पुरुष प्रवासी त्यातन बसत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आणखी वाचा-फूड डिलिव्हरीचा स्टार्टअप ते ‘यूपीएससी’ परीक्षेत यश, धुळ्याचा हिमांशू टेंभेकर देशात ७३८ वा

सामान्य लोकलच्या महिला डब्यात पुरूष फेरीवाले बिनधास्तपणे घुसखोरी करून सामग्रीची विक्री करतात. अनेक वेळा तीन ते चार पुरुष विक्रेते एकत्र येतात. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण असते. आता वातानुकूलित लोकलच्या डब्यात पुरुष प्रवासी येत असल्याने, यावर अंकुश लावणे आवश्यक आहे. यात रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस, आरपीएफ प्रशासन यांनी लक्ष घालणे आवश्यक असल्याचे मत एका महिलेने व्यक्त केले.

वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासनीस आणि आरपीएफ यांच्याद्वारे वारंवार तपासणी केली जाते. याबाबत महिला प्रवाशांची काही तक्रार आल्यास त्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. -ए. के. जैन, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या कमी आहेत. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलमध्ये पुरुष प्रवासी घुसखोरी करत असल्याचे दिसून येत आहे. -प्रिती चौधरी, प्रवासी