मुंबई : ‘घाटकोपर- अंधेरी-वर्सोवा मेट्रो १’ सेवा तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास विस्कळीत झाली. ‘मेट्रो १’च्या कर्मचारी- अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आवश्यक त्या उपाययोजना, दुरुस्ती करून काही मिनिटांत ‘मेट्रो१’ची सेवा पूर्ववत केली. त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास ‘मेट्रो१’ची सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून देण्यात आली.
मुंबईतील घाटकोपर – वर्सोवा मार्गावर धावणारी मुंबई मेट्रो १ ची वाहतूक सेवा सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली होती. अंधेरी स्थानकावर एका ट्रेनमध्ये झालेल्या बिघाडामुळे दुसऱ्या ट्रेनच्या मदतीने बिघाड झालेल्या ट्रेनला ओढण्यात आले. मात्र, तांत्रिक बिघाडाचे कारण कळू शकेलेले नाही. हा तांत्रिक बिघाड कार्यालयीन वेळेत झाल्यामुळे घाटकोपर, चकाला स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली होती. मेट्रोची सेवा साधारण १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होती. वर्सोवा – घाटकोपर दरम्यान सुमारे ४५ मिनिटे मेट्रो नव्हती. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, सायंकाळी मेट्रोमध्ये मुंबईतील लोकल इतकीच गर्दी असते. त्यावेळीच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नोकरदारांची तारांबळ उडाली. परंतु, दुरुस्ती केल्यानंतर मेट्रो सेवा सुरळीत झाली.
