मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येने नवीन विक्रम केला आहे. या मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येने मंगळवार, ८ जुलै रोजी तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. या दिवशी ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरून ३ लाख १ हजार १२७ प्रवाशांनी प्रवास केला. आतापर्यंतची ही सर्वाधिक दैनंदिन प्रवासी संख्या आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये, तर दुसरा टप्पा जानेवारी २०२३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. वाहतूक सेवेत दाखल झालेल्या या मार्गिकांना सुरुवातीला खूपच कमी प्रतिसाद मिळत होता. मात्र मागील वर्षभरापासून प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळेच सुरुवातील प्रतिदिन ३० हजार असलेली प्रवासी संख्या आता २ लाख ६० हजारांवर पोहचली आहे.
वर्षभरात दैनंदिन प्रवासी संख्येत महिन्याला ५ टक्क्यांनी वाढ होत असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. त्यामुळेच २४ जून रोजी २ लाख ९७ हजार ६०० अशी असलेल्या विक्रमी दैनंदिन प्रवासी संख्येने ८ जुलै रोजी तीन लाखांचा टप्पा पार केल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. ८ जुलै रोजी ३ लाख १ एक हजार १२७ प्रवाशांनी ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरून प्रवास केला असून आतापर्यंतची ही विक्रमी दैनंदिन प्रवासी संख्या आहे. प्रवाशांकडून या मार्गिकांना वाढत चाललेल्या प्रतिसादाबाबत महानगर आयुक्त डाॅ संजय मुखर्जी यांनी समाधान व्यक्त करत प्रवाशांचे आभार मानले.
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येने ८ जुलै रोजी विक्रम केला असतानाच दुसरीकडे ई तिकिटांचीही या दिवशी विक्रमी विक्री झाली. या दिवशी ६२ हजार २८२ प्रवाशांनी व्हाट्स ॲप माध्यमातून ई तिकिट खरेदी केले आहे.
अशी होत गेली दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ
८ ऑगस्ट २०२४-२ लाख ६९ हजार २३०
७ ऑक्टोबर २०२४ -२ लाख ९२ हजार ५७५
१८ जून २०२५- २ लाख ९४ हजार ६८१
२४ जून २०२५- २ लाख ९७ हजार ६००
८ जुलै २०२५-३ लाख १ हजार १२७