लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : ‘अंधेरी पश्चिम – मानखुर्द मेट्रो २ ब’ मार्गिकेवरील मेट्रो स्थानकात उतरल्यानंतर पुढे इच्छित स्थळी जाणे सोपे व्हावे यासाठी बहुवाहतूक परिवहन एकत्रिकरण प्रकल्प (मल्टि मॉडल इंटिग्रेशन प्लॅन) राबविण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेवरील २० स्थानकांबाहेर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पांतर्गत ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेवरील २० स्थानकांबाहेर बेस्ट, रिक्षा, टॅक्सी सेवा उपलब्ध करून देण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.

एमएमआरडीए मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणत आहे. मात्र प्रवाशांना मेट्रोकडे आकर्षित करण्याचे मोठे आव्हान आहे. मेट्रोतून उतरल्यानंतर प्रवाशांना इच्छित स्थळी जाणे सोपे झाल्यास मेट्रोला प्रतिसाद मिळेल असा विचार करून एमएमआरडीएने बहुवाहतूक परिवहन एकत्रिकरण प्रकल्पाची संकल्पना मांडली. हा प्रकल्प सर्व मेट्रो मार्गिकांच्या स्थानकांमध्ये राबविण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार आता ‘मेट्रो २ ब’मध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. २३.६४३ किमी लांबीच्या या मार्गिकेवरील २० स्थानकांबाहेर २५० मीटर त्रिजेच्या आत बहुवाहतूक परिवहन एकत्रीकरण प्रकल्पाअंतर्गत बेस्ट,रिक्षा, टॅक्सी अशा वाहतूक व्यवस्थेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे मेट्रो स्थानक गाठणे वा मेट्रो स्थानकातून बाहेर पडल्यानंतर इच्छित स्थळी पोहचणे सोपे होणार आहे.

आणखी वाचा-मुंबई पोलिसांची अमली पदार्थ तस्करीवर मोठी कारवाई, धारावी-दहिसरमध्ये ५ कोटीचा माल जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मेट्रो २ ब’वरील २० स्थानकांबाहेर ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अंदाजे २२३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. चार टप्प्यांमध्ये बहुवाहतूक परिवहन एकत्रीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यात पाच स्थानकांचा समावेश असणार आहे. यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी एमएमआरडीएने नुकत्याच निविदा मागविल्या आहेत. लवकरच कंत्राटदाराची नियुक्ती करून या सुविधेचा विकास करण्यात येणार आहे. या सुविधा कार्यान्वित झाल्यानंतर दोन वर्षांमध्ये या सुविधेची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर असणार आहे. एमएमआरडीएच्या या निर्णयामुळे ही मार्गिका कार्यान्वित झाल्यास प्रवाशांचा प्रवास सुकर होईल. मात्र यासाठी २०२५ पर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.