मुंबई: स्पॅनिश पाॅप गायक आणि गीतकार एनरिक इग्लेसियस याच्या संगीताचा कार्यक्रम वांद्रे-कुर्ला संकुल येथे बुधवारी (२९ आॅक्टोबर) आणि गुरुवारी (३०आॅक्टोबर) होणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गर्दी होणार असून कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना घरी परतणे सोपे व्हावे यासाठी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) कफ परेड-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरील सेवा बुधवारी आणि गुरुवारी रात्री १२ पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बीकेसी मेट्रो स्थानकावरुन बुधवारी आणि गुरुवारी रात्री १२ वाजता कफ परेडसाठी एक गाडी तर आरेसाठी एक गाडी अशी शेवटची गाडी सुटणार आहे. यामुळे कार्यक्रमासाठी आलेल्यांची सोय होणार आहे.
मेट्रो ३ मार्गिका ८ सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने धावू लागली असून मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद या मार्गिकेला मिळत आहे. सध्या सकाळी ५.५५ ते रात्री १०.३० या वेळे मेट्रो धावते. आरे आणि कफ परेडवरुन सकाळी ५.५५ ला पहिली तर रात्री १०.३० ला शेवटी गाडी सुटते. बुधवारी (२९ आॅक्टोबर) आणि गुरुवारी (३० आॅक्टोबर) मात्र मेट्रोची सेवा रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती एमएमआरसीने एक्सवरुन (ट्विटर) दिली आहे. स्पॅनिश पाॅप गायक आणि गीतकार एनरिक इग्लेसियस याच्या संगीताचा कार्यक्रम वांद्रे-कुर्ला संकुल येथे बुधवारी (२९ आॅक्टोबर) आणि गुरुवारी (३०आॅक्टोबर) होणार आहे.
या कार्यक्रमासाठी येणार्या प्रेक्षकांना घरी परतणे वा इच्छितस्थळी पोहचणे रात्रीच्या वेळेस सोपे व्हावे याकरिता मेट्रोची सेवा रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार असल्याचे एमएमआरसीकडून सांगण्यात आले आहे. रात्री १०.३० वाजता कफ परेडवरुन आणि आरेवरुन शेवटची गाडी सुटते. या गाड्या शेवट्या स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी तासाभराची कालावधी लागतो. त्यामुळे साडे अकरापर्यंत मेट्रो ३ ची सेवा सुरु असते.
बुधवारी आणि गुरुवारी मात्र १२ वाजता बीकेसी स्थानकावरुन आरे आणि कफ परेडसाठी शेवटची गाडी सुटणार आहे. त्याचवेळेस रात्री १०.३० ते १२ या वेळेत कफ परेड आणि आरेवरुन तीन गाड्या सुटणार आहेत. त्यामुळे एनरिक इग्लेसियसच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावणाऱ्या प्रेक्षकांची सोय होणार आहे.
