मुंबई : कुलाबा- वांद्रे- सीप्झ मेट्रो ३ तीन प्रकल्पातील कारशेडचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. त्यात श्रीसिटी येथे तयार असलेली पहिली मेट्रो गाडीही मुंबईत दाखल होण्याच्या प्रतीक्षेत आहे. गाडीच न आल्याने तसेच मरोशी येथील तात्पुरती कारशेडही अद्याप पूर्ण न झाल्याने मेट्रो ३ ची चाचणीही (ट्रायल रन) रखडली आहे. या पार्श्वभूमीवर सीप्झ ते वांद्रे- कुर्ला संकुल असा मेट्रो ३ चा पहिला टप्पा जानेवारी २०२४ मध्ये पूर्ण होणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोशन (एमएमआरसी)मार्फत ३२.५ किमीच्या मेट्रो ३ चे काम सुरू आहे. ३३ हजार कोटींपेक्षा अधिक किमतीच्या या प्रकल्पाचे बांधकाम वेगात सुरू आहे. भुयारीकरण आणि मेट्रो स्थानकाची कामे वेगाने पुढे जात आहेत. मात्र कोणत्याही मेट्रो प्रकल्पातील महत्त्वाचा भाग असलेल्या कारशेडचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. कारशेड आरे येथील जागेत उभी करण्यास विरोध झाल्याने आरेतील कारशेड रद्द करण्यात आली. आता कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र या जागेवरूनही वाद निर्माण झाल्याने, हा वाद थेट न्यायालयात गेल्याने कारशेड पुन्हा रखडले आहे. याबाबत न्यायालयाचा निर्णय येण्यास वेळ लागणार असल्याने राज्य सरकार आणि एमएमआरसीने कारशेडच्या जागेसाठी इतर पर्याय शोधले आहेत. मात्र त्यावर निर्णय झालेला नाही.

 कारशेड अधांतरी असताना एमएमआरसीने वांद्रे- कुर्ला संकुल ते सीप्झ हा पहिला टप्पा जानेवारी २०२४ मध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे एमएमआरसी कारशेडचा प्रश्न कधी आणि कसा मार्गी लावणार असा प्रश्न आहे. त्यात अजूनही मेट्रो गाडी मुंबईत दाखल झालेली नाही किंवा चाचणी अर्थात ट्रायल रनही झालेली नाही. आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथे पहिली गाडी तयार होऊन कित्येक महिने झाले पण अद्याप गाडी आलेली नाही. तसेच मरोळ ..मरोशी येथे तात्पुरती कारशेडही तयार झालेली नाही. त्यामुळे गाडी आणून ठेवायची कुठे असा प्रश्न एमएमआरसी समोर आहे. गाडी आणि तात्पुरते कारशेड नसल्याने मेट्रो ३ चाचणी रखडली आहे.

राज्य सरकारकडून अद्याप परवानगी नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याविषयी एमएमआरसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी श्रीसिटी येथून गाडी आणण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे. पण अजून परवानगी मिळालेली नाही. तसेच तात्पुरत्या कारशेडचे कामही अपूर्ण आहे असे सांगितले. ही सगळी महत्त्वाची कामे अपूर्ण असताना जानेवारी २०२४ मध्ये मेट्रो ३ चा पहिला टप्पा कसा पूर्ण करणार याविषयी मात्र एमएमआरसीकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.