मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवर धावणाऱ्या गाडीत दुपारी तांत्रिक बिघाड झाला. गाडीतून ठिणग्या उडाल्या, धूर आला आणि जळल्याचा वास येऊ लागला. त्यामुळे मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या (एमएमआरसी) अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गाडी सांताक्रुझ मेट्रो स्थानकावर आणून प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढले आणि दुसऱ्या गाडीतून पुढे नेले. यादरम्यान मेट्रो ३ मार्गिकेवरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली. पण या घटनेमुळे भुयारी मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एमएमआरसीच्या ३३.५ किमीच्या मेट्रो ३ मार्गिकेतील आरे – आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गिका सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. या मेट्रो मार्गिकेवरून आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या दिशेने जाणारी गाडी शुक्रवारी दुपारी २.४४ वाजता अचानक सांताक्रुझ मेट्रो स्थानकावर थांबवून गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या गाडीत तांत्रिक बिघाड झाला आणि गाडीतून अचानक ठिणग्या उडू लागल्या, त्यानंतर धूर झाला आणि जळल्याचा वास येऊ लागला. या प्रकारामुळे प्रवासी घाबरले आणि एकच गोंधळ उडाला. त्यानंतर सांताक्रुझ मेट्रो स्थानकात गाडी थांबवून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर गाडी तांत्रिक तपासणीसाठी बीकेसी लूपलाईनवर नेण्यात आली. तर प्रवाशांना दुसऱ्या गाडीने पुढे नेण्यात आले. यावेळी कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही, मात्र या घटनेमुळे भुयारी मेट्रोच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मागील काही दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो आणि मोनो गाड्या बंद पडून त्यात प्रवासी अडकण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. ऑगस्टमध्ये दोन मोनो गाड्या अडकल्या होत्या. दोनपैकी एका मोनो गाडीतील प्रवाशांना गाडीचा दरवाजा तोडून अग्निशमन दलाने बाहेर काढले होते. तर यानंतरही मोनोरेल गाडी बंद पडली, प्रवासी अडकले.

शेवटी एमएमआरडीएने मोनोरेल सेवाच काही काळासाठी बंद करून मोनोरेलचे अत्याधुनिकरण हाती घेतले आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी मेट्रो ९ (दहिसर ते मिरा-भाईंदर) मार्गिकेवरील चाचणीसाठी निघालेली गाडी सकाळच्या वेळी तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली) मार्गिकेवरील ओवरीपाडा स्थानकावर अडकली होती. त्यामुळे मेट्रो ७ वरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या मेट्रो, मोनो प्रकल्पांतील गाड्यांमध्ये सातत्याने बिघाड होत असून त्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागत असल्याने या प्रकल्पांच्या दर्जावर आणि सुरक्षिततेवरच आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.