मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरु असू या मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा शक्य तितक्या लवकर वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यानुसार कामांना वेग देत आता एमएमआरडीएकडून एक महत्त्वाचा टप्पा पार केला जाणार आहे. शनिवारी, १० मे रोजी दहिसर ते काशीगावदरम्यान मार्गिकेवरील विद्युत प्रवाह कायमस्वरुपी कार्यान्वित केला जाणार आहे. हा विद्युत प्रवाह कार्यान्वित झाल्यानंतर चार-पाच दिवसांत या मार्गिकेवर मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता लवकरच दहिसर ते काशीगावदरम्यान पहिल्यांदाच मेट्रो धावणार आहे.

१३.६ किमीची मार्गिका

दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ आणि दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो ७ अ ला विस्तार म्हणजे मेट्रो ९. ६,६०६ कोटी रुपये खर्चाची अशी ही दहिसर ते मिरा-भाईंदर अशी १३.६ किमीची मार्गिका आहे. त्या मार्गिकेत एकूण १० मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. मार्गिकेचे काम सध्या एमएमआरडीएकडून सुरु असून आतापर्यंत ९७ टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत. मार्गिकेचे काम दोन टप्प्यात करण्यात येत असून दहिसर ते काशीगाव असा हा पहिला टप्पा आहे. त्याची एकूण लांबी ४.५ किमी अशी आहे. तेव्हा हा ४.५ किमीचा टप्पा डिसेंबरअखेरपर्यंत वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यामुळेच एमएमआरडीएने कामाला वेग देत आता मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांना सुरुवात करण्याच्यादृष्टीने पाऊले उचलली आहेत. दहिसर ते काशीगावदरम्यानच्या मार्गिकेवरील विद्युतीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर आता १० मे, शनिवारी या मार्गिकेवरील विद्युत प्रवाहास सुरुवात करण्यात येणार आहे.

डिसेंबरमध्ये पहिला टप्पा वाहतूक सेवेत

कायमस्वरुपी विद्युत प्रवाह कार्यान्वित झाल्यास मेट्रो गाड्यांच्या चाचणीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे विद्युत प्रवाह कार्यान्वित झाल्यानंतर दहिसर ते काशीगाव या ४.५ किमीच्या अंतरावर मेट्रो गाड्यांच्या चाचण्या सुरु केल्या जाणार आहेत. त्यामुळे आता लवकरच पहिल्यांदाच दहिसर ते काशीगाव अशी मेट्रो धावताना दिसेल. पण या मेट्रो मार्गिकेवरुन प्रवास करण्यासाठी प्रवाशांना डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण ४.५ किमी मार्गिेकवरील १०० टक्के काम पूर्ण करत, चाचण्या यशस्वीपणे पूर्ण करत सुरक्षा प्रमाणपत्र घेतल्यानंतर या मार्गिकेवरील मेट्रो संचलनाचा मार्ग मोकळा होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासाठी डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे. दरम्यान या मार्गिकेतील कारशेड उत्तन, डोंगरी येथे प्रस्तावित असून अद्याप या कारशेडच्या कामास सुरुवात झालेली नाही. कारशेडशिवाय मेट्रो संचलन शक्य नाही. त्यामुळे मेट्रो ९ मार्गिकेतील पहिला टप्पा डिसेंबरमध्ये कसा कार्यान्वित होणार हा प्रश्न होता. पण एमएमआरडीएने शक्कल लढवत मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ मार्गिकेतील चारकोप कारशेडचा वापर मेट्रो ९ मार्गिकेवरील पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी केला जाणार आहे. डोंगरी कारशेड पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण मेट्रो ९ मार्गिकेसाठी डोंगरी कारशेड वापरात आणले जाणार आहे.