मुंबई : वडाळा – ठाणे – कासारवडवली – गायमुख मेट्रो ४ आणि ४ अ मार्गिकेतील कॅडबरी जंक्शन – गायमुख दरम्यानच्या १०.५ किमीचा टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. त्यानुसार सप्टेंबरमध्ये कॅडबरी जंक्शन – गायमूख टप्प्यातील मेट्रो गाड्यांच्या चाचणीला सुरुवात करण्यात येणार आहे.

यासाठी वेगात तयारी सुरू असून आता शनिवारी (३० ऑगस्ट) १०.५ किमी मार्गिकेतील डोंगरीपाडा मेट्रो स्थानक – गायमुख मेट्रो स्थानकांदरम्यानच्या ४.६३८ किमीच्या मार्गिकेवरील विद्युत प्रवाह कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, ओव्हरहेड लाईनच्या जवळ जाऊ नये यासंबंधीची सार्वजनिक अधिसूचना एमएमआरडीएकडून जारी करण्यात आली आहे. चाचणी सुरू झाल्यास ठाण्यातून पहिल्यांदाच मेट्रो धावताना दिसणार आहे.

एमएमआरडीएने वडाळा – कासारवडवली दरम्यानच्या ३२.३२ किमी लांबीच्या आणि कासारवडवली – गायमुख दरम्यानच्या २.७ किमी लांबीच्या मेट्रो ४, ४ अ मार्गिकांचे काम हाती घेतले आहे. या मार्गिकेतील कॅडबरी जंक्शन – गायमुखदरम्यानच्या १०.५ किमी लांबीचा टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करून ठाणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण केले जाणार आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी स्थानकांच्या आणि इतर कामांना एमएमआरडीएने वेग दिला आहे.

दुसरीकडे मेट्रो मार्गिकेच्या संचलनासाठीच्या अत्यंत महत्त्वाचा आणि पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये सुरू करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या महत्त्वाच्या टप्प्यात मेट्रो गाड्यांची चाचणी करण्यात येणार आहे. मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांना सुरुवात करण्यासाठी एमएमआरडीएने आनंद नगर जंक्शन येथे मेट्रो गाड्यांचे सहा डबे नुकतेच यशस्वीरित्या उन्नत रुळांवर चढविले आहेत. हे डबे कासारवडवली स्थानकांपर्यंत नेण्यात आले आहेत. आता या डब्यांची जोडणी करून गाडी चाचणीसाठी सज्ज केली जाणार आहे. ही चाचणी सप्टेंबरमध्ये सुरू करण्याच्यादृष्टीने एमएमआरडीएने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कॅडबरी जंक्शन – गायमूख या टप्प्यातील डोंगरीपाडा मेट्रो स्थानक – गायमूख मेट्रो स्थानक टप्प्यातील विद्युत प्रवाह शनिवारी कार्यान्वित करण्यात येणार आहे.

एमएमआरडीएच्या सार्वजनिक अधिसूचनेनुसार ४.६३८ किमीच्या मार्गिकेवरील विद्युत प्रवाह कायमस्वरुपी कार्यान्वित केला जाणार आहे. त्यापुढील टप्प्यातील डोगंरीपाडा मेट्रो स्थानक – कॅडबरी जंक्शनदरम्यानचाही विद्युत प्रवाह लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे. हा विद्युत प्रवाह कार्यान्वित झाल्यास मेट्रो गाड्यांच्या चाचणीचा मार्ग मोकळा होणार आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मेट्रो गाड्यांची चाचणी होण्याची शक्यता आहे. चाचणी सुरू झाल्यास पहिल्यांदाच ठाण्यात मेट्रो धावणार आहे. डिसेंबरमध्ये ठाणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.