Mumbai Mhada Lottery Update: म्हाडाच्या मुंबई मंडळाची पाच हजार घरांची सोडत दिवाळीत काढण्यात येणार असल्याचे म्हाडाने जाहीर केले होते. पण आता दिवाळीत मुंबईतील घरांची सोडत काढण्यात येणार नसून आता इच्छुकांना सोडतीसाठी मार्च-एप्रिल २०२६ मध्ये सोडत काढण्यात येणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी याबाबतची माहिती दिली. सोडतीसाठी पुरेशी घरेच उपलब्ध नसल्याने यावर्षी सोडत होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील म्हाडाच्या घरांना मोठी मागणी असून दरवर्षी या घरांसाठी मोठ्या संख्येने अर्ज येतात. मुंबईतील घरांच्या सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष असते. २०२५ सालातील सोडत दिवाळीत काढण्यात येणार असल्याचे म्हाडाकडून जाहीर करण्यात आले होते. सुमारे ५ हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले होते. तर पत्राचाळीतील अंदाजे २५०० घरांचा समावेश चालू बांधकाम प्रकल्पातील घरे म्हणून करण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते.
म्हाडाच्या घोषणेनुसार आतापर्यंत सोडतीसाठीची जाहिरात तयार करण्याच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र या तयारीला सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे यावर्षी सोडत होणार नाही. पुरेशी घरे नसल्याने दिवाळीची सोडत रखडणार असल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्तावर अखेर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले.
पत्राचाळीतील घरांना पर्यावरणविषयक परवानगी नसल्याने या घरांची कामे निर्धारीत वेळेत सुरू होऊ शकली नाहीच. पण आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण परवानगीचा मार्ग मोकळा केला आहे. त्यानुसार लवकरच पुढील कार्यवाही करून घरांच्या कामास सुरुवात होईल. तर २०२५-२६ या आर्थिक वर्षात सोडत काढण्यात येईल, असे जयस्वाल यांनी जाहीर केले. यावरून आता दिवाळीत सोडत होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे निवडणुका संपल्यानंतरच अर्थात मार्च-एप्रिल २०२६ मध्ये सोडत काढली जाणार आहे. मुंबई मंडळाकडून २००६ ते २०१९ या कालावधीत कधी सोडतीत खंड पडला नव्हता. २०२० ते २०२२ दरम्यान सोडत निघाली नाही. तर २०२३, २०२४ मध्ये सोडत काढण्यात आली. तर आता २०२५ मध्ये सोडतीत खंड पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता मुंबईतील घरांच्या सोडतीसाठी इच्छुकांना मार्च-एप्रिल २०२६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
‘म्हाडासाथी’ देणार म्हाडाची इत्यंभूत माहिती
म्हाडाने आपले संकेतस्थळ अधिकाधिक अत्याधुनिक करून विजेत्यांना, नागरिकांना, म्हाडा रहिवाशांना, उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांना म्हाडाची सर्व माहिती सुलभपणे आणि अत्याधुनिक पद्धतीने कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी म्हाडाने एआय चॅटबॉटचा आधार घेतला आहे. म्हाडाच्या संकेतस्थळावर जाऊन एआय चॅटबॉटच्या माध्यमातून आवश्यक ती माहिती मिळविता येणार आहे. या एआय चॅटबॉट प्रणालीला म्हाडाने ‘म्हाडासाथी’ असे नाव दिले असून या एआय चॅटबॉट सेवेला गुरुवारी जयस्वाल यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.