मंगल हनवते

मुंबई : मागील चार वर्षांपासून म्हाडाच्या घरांच्या सोडतीची मुंबईकरांची प्रतीक्षा आता अखेर संपणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने सोडतीतील घरांची संख्या आणि किंमती निश्चित केल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील ३८२० घरांसाठी सोडत काढण्यात येणार असून सर्व उत्त्पन्न गटातील घरांचा यात समावेश आहे. अत्यल्प गटासाठी सर्वाधिक २६१२ घरे असणार आहेत तर मध्यम गटासाठी सर्वात कमी म्हणजे केवळ ८५ घरे आहेत. ३२ लाख रुपयांपासून ते चार कोटी ३८ लाख रुपयांपर्यंतच्या घरांचा सोडतीत समावेश आहे. या घरांच्या सोडतीसाठी एप्रिलअखेरीस वा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

हेही वाचा >>>“…अशी कामं आमच्याकडे नगरसेवक अन् शाखाप्रमुख करतात”, रोजगार मेळाव्यावरून संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला!

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांसाठी लाखो अर्ज करण्यात येतात. मात्र २०१९ नंतर मुंबईतील घरांसाठी सोडत निघालेली नाही. आता मात्र मुंबई मंडळाने सोडतीच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. त्यानुसार बुधवारी सोडतीतील घरांची संख्या आणि किंमती निश्चित करून त्या अंतिम करण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली. आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.एप्रिल अखेरीस किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध झाल्यास पुढे महिना ते सव्वा महिना नोंदणी, अर्जविक्री आणि अर्जस्वीकृती प्रक्रिया राबविली जाईल. त्यामुळे जूनमध्ये सोडतीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोणत्या गटासाठी किती घरे

अत्यल्प गट-२ ६१२ घरे

अल्प गट-१००७ घरे

मध्यम गट-८५ घरे

उच्च गट-११६ घरे

एकूण घरे ३८२०

कुठे किती घरे ?

ठिकाण-उत्त्पन्न गट-एकूण सदनिका

पहाडी गोरेगाव-अत्यल्प गट-१७७०
अँटॉप हिल, वडाळा-अत्यल्प गट-४१८
कन्नमवार नगर-अत्यल्प गट-१६६
कन्नमवार नगर-अत्यल्प गट-२५८
पहाडी गोरेगाव-अल्प गट-७३६
साकेत सोसायटी, गोरेगाव-अल्प गट-०७
गायकवाड नगर मालाड-अल्प गट-०२
पत्राचाळ, गोरेगाव-अल्प गट-०२
जुने मागाठाणे, बोरिवली-अल्प गट-१७२
चारकोप, कांदिवली, सेक्टर ५-अल्प गट-०३
कन्नमवार नगर, इमारत क्रमांक १०-अल्प गट-१८
विक्रांत सोसायटी, विक्रोळी-अल्प गट-२३
एम्बसी सोसायटी-अल्प गट-३१
गव्हाणपाडा, मुलुंड-अल्प गट-०३
पीएमजीपी, मानखुर्द-अल्प गट-०९
मनहास सोसायटी-अल्प गट-०१
उन्नत नगर, गोरेगाव-मध्यम गट-२८
थ्री स्टार सोसायटी, कांदिवली, महावीर नगर-मध्यम गट-०५
आयडियल अपार्टमेंट, जेव्हीपीडी-मध्यम गट-१३
जुहू विक्रांत, जेव्हीपीडी-मध्यम गट-०१
निर्यानंद नगर ४, अंधेरी-मध्यम गट-१७
ट्युलिप सोसायटी, जेव्हीपीडी, अंधेरी-मध्यम गट-०४
उदय भवन,शेल कॉलनी,सहकार नगर, चेंबूर-मध्यम गट-०६
टिळक नगर, चेंबूर-मध्यम गट-०१
चांदीवली, पवई-मध्यम गट-०२
चारकोप, कांदिवली-मध्यम गट-०८
जुहू विक्रांत, जेव्हीपीडी-उच्च गट-२८
सिटी व्ह्यू इमारत, लोअर परळ-उच्च गट-०४
हेरिटेज अपार्टमेंट, शीव-उच्च गट- ०२
प्रतीक्षा नगर, शीव -उच्च गट-०१

शिंपोली, कांदिवली-उच्च गट-१७

तुंगा पवई-उच्च-६४

एकूण-३८२०

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाखांपासून ते कोटीपर्यंतची घरे

सोडतीतील ३८२०घरांच्या अंदाजित किंमतीही बुधवारी मंडळाने निश्चित केल्या आहेत. सर्वात महागडे घर हे अंधेरीतील जुहू विक्रांत येथील असून या घराची किंमत ४ कोटी ३८ लाख रुपये आहे. त्याच प्रकल्पातील आणखी काही घरे ही ३ कोटी ८१ लाख रुपये किंमतीची आहेत. अंधेरीतील आयडीयल अपार्टमेंटमधील मध्यम गटासाठीच्या घराची किंमत २ कोटी ४१ लाख रुपये आहे. सर्वात कमी किंमती या पहाडी गोरेगावमधील घरांच्या आहेत. तेथील अत्यल्प गटातील घरांची किंमत ३२ लाख ९४ हजार रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे. तेथील अल्प गटातील घरांची किंमत ४५ लाख ८६ हजार रुपये आहे.