मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने चितळसर, मानपाडा येथील भूखंड विक्रीसाठी २००० साली अर्ज मागविले होते. त्यानुसार १५६ अर्जदारांनी अर्ज सादर करून अनामत रक्कम भरली होती. पण काही कारणांमुळे ही योजना रखडली. पण आता मात्र तब्बल २५ वर्षानंतर या अर्जदारांना कोकण मंडळाने चितळसर, मानपाडा येथे उभ्या रहिलेल्या बहुमजली इमारतीत घरे देण्याचा निर्णय घेतला आहे.
सोडतीच्या जाहिरातीनुसार अल्प गटातील घराची किंमती ५१ लाख ८३ हजार ९८० रुपये ते ५२ लाख ५४ हजार ६९५ रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे १५६ अर्जदारांना २५ वर्षानंतर मिळणाऱ्या घरांसाठी ५१ ते ५२ लाख रुपये मोजावे लागणार आहे. या किंमती ऐकून अर्जदार हवालदिल झाले आहेत. या घराची भरमसाठ किंमती परवडणारी नाही. त्यामुळे घराची किंमती कमी करण्याची मागणी अर्जदारांनी म्हाडा प्राधिकरणाकडे केली आहे.
तांत्रिक अडचणीमुळे योजना रखडली
चितळसर, मानपाडा येथील भूखंड विक्रीसाठी २००० साली कोकण मंडळाने जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविले होते. ४५० चौ. फुटांचा भूखंड १ लाख ८० हजार रुपयांमध्ये देण्यात येणार होता. त्यानुसार १५६ अर्जदारांनी अर्ज भरले, त्यासाठी १० हजार रुपये अनामत रक्कमही भरली. मात्र भूखंड विक्रीची ही योजना रखडली. ठाणे महापालिकेने विस्थापित गृहनिर्माण योजना असे आरक्षण प्रस्तावित केले. परिणामी, भूखंड विक्रीसाठी पालिकेची मान्यता न मिळाल्याने म्हाडाला भूखंड विक्री करणे अशक्य झाले. मात्र पुढे २००६ मध्ये याच जागेवर स्वीस चॅलेंज पद्धतीने विकासकाकडून बहुमजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव आणला. २००६ मध्ये हाती घेण्यात आलेला हा प्रकल्प आता पूर्ण झाला आहे. बहुमजली इमारत उभी राहिली असून या प्रकल्पांतील घरांची विक्री सोडतीद्वारे केली जाणार आहे. या प्रकल्पात १००० हून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. त्यामुळे यातील १५६ घरे २००० सालातील अर्जदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तर ८६९ घरे सोडतीत समाविष्ट करत सर्वसामान्यांना उपलब्ध करण्यात येणार आहेत.
१ लाख ८० हजारात मिळणार होता भूखंड
सोडतीच्या जाहिरातीनुसार अल्प गटातील ३२.६६ ते ३३.१० चौ. मीटरच्या अल्प गटातील घरांसाठी ५१ लाख ८३ हजार ९८० रुपये ते ५२ लाख ५४ हजार ६९५ रुपये अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे. ही किम्मत १५६ अर्जदारांसाठीही लागू होणार आहेत. मात्र ही किंमत ऐकून अर्जदार हवालदिल झाले आहेत. आम्हाला २००० मध्ये १ लाख ८० हजारात भूखंड मिळाला असता, त्यावर आम्ही हवी तशी घरे बांधली असती.
पुनर्विकासाअंतर्गत पुढे आम्हाला किती तरी मोठी घरे मिळाली असती. असे असताना २५ वर्ष आम्हाला काही दिले नाही आणि आता घरे देत आहेत. आता ३५० चौ. फुटांच्या घरासाठी ५१ ते ५२ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. ही किंमत भरमसाठ आणि आम्हाला परवडणारी नाही असे अर्जदार हेमंत पांडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. या किंमती अधिक असल्याने आम्ही म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन किंमती कमी करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांनी अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आम्ही लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही पांडे यांनी सांगितले.
याविषयी कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्याकडे विचारणा केली असता अर्जदारांना आजच्या किंमतीनुसार घरांचे वितरण करण्यात येईल असे आम्ही जाहिरातीत नमूद केले होते. धोरणानुसारच आम्ही घरांच्या किंमती निश्चित केल्या आहेत. या किंमती अधिक वाटत असतील तर उच्चस्तरावरच निर्णय होईल, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे म्हाडा उपाध्यक्ष याबाबत काय भूमिका घेतात याकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे.