पालघर, रायगड, ठाण्यामधील एकूण २७४.११ हेक्टर जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव

मंगल हनवते

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने कळव्यातील मफतलाल कंपनीच्या जागेपाठोपाठ आता कोकणातील २७४.११ हेक्टर शासकीय जागा संपादित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोकण मंडळाने याबाबतचा प्रस्ताव सरकार, जिल्हाधिकारी, तसेच संबंधित विभागाला पाठविला आहे. पालघर, रायगड आणि ठाण्यात ही जागा असून ती उपलब्ध झाल्यास भविष्यात मंडळाला मोठय़ा संख्येने घरांची बांधणी करणे शक्य होणार आहे.

कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील परवडणाऱ्या घरांना मोठी मागणी आहे. मात्र मंडळाकडे आता मोकळी जागा नसल्याने परवडणारी घरे उपलब्ध करणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर मंडळाने मोकळय़ा जमिनी विकत वा सरकारकडून संपादित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कळव्यातील मफतलाल कंपनीची जमीन ताब्यात घेण्यासाठी उच्च न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला आहे. ही जमीन मिळाली तर तेथे ३० हजारांहून अधिक घरे बांधता येणार आहेत. या जमिनीपाठोपाठ आता पालघर, रायगड आणि ठाणे येथील शासकीय जमिनी मंडळाने शोधून काढल्या आहेत. या जमिनी सरकारी नियमानुसार ताब्यात मिळाव्यात यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. ही एकूण २७४.११ हेक्टर जागा असून ती मिळविण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. ही जागा मिळाली तर कोकणात मोठय़ा प्रमाणावर घरांची निर्मिती करणे शक्य होईल, असे म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारी जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या वृत्ताला कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दुजोरा दिला.

दीड हेक्टरपासून ९० हेक्टर क्षेत्रफळापर्यंतच्या या जागा आहेत. तर महसूल विभाग, जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग अशा सरकारी विभागाच्या या जागा आहेत. त्यामुळे गृहनिर्माण विभाग आणि त्या त्या संबंधित विभागाकडे मंडळाने जमीन मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. या पाठपुराव्याला यश मिळाल्यास येत्या काळात पालघर, रायगड आणि ठाण्यात सर्वसामान्यांसाठी मोठय़ा संख्येने म्हाडाची घरे उपलब्ध होतील.

म्हाडाची घरे कुठे?

  •   रायगड : उसर्ली (पनवेल), विचुंबे (पनवेल), केळवली (खालापूर)
  •   पालघर  : बोळिंज (वसई), नंडोरे (पालघर), पालघर, उमरोळी (पालघर)
  •   ठाणे :  दापोडी (भिवंडी), बापगाव (भिवंडी), खर्डी (शहापूर), खिडकाळी (ठाणे), निळजे पाडा (कल्याण), चिखलोली (अंबरनाथ), मौजे कळवा (ठाणे) आणि कळवा.