मंगल हनवते, लोकसत्ता

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २०१८ च्या सोडतीतील बाळकूम गृहयोजनेतील घरांच्या किमतीत मंडळाने तब्बल १६ लाख २९ हजार ५६४ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे येथील घराची किंमत ४३ लाख ४५ हजार २३६ रुपयांवरून ५९ लाख ७४ हजार ८०० रुपयांवर पोहोचली आहे. ही किंमत ऐकून १२५ विजेत्यांसह विशेष योजनेतील ६९ लाभार्थ्यांना ही रक्कम कशी भरायची असा प्रश्न पडला आहे. कोकण मंडळाला पाणीपुरवठा, वाहनतळ, मेट्रो उपकर आणि व्याज रूपाने असा एकूण ३२ कोटी १० लाख २४ हजार ३९७ रुपये अतिरिक्त खर्च प्रकल्पासाठी आला आहे. हा भार आता मंडळाने विजेत्यांवर टाकल्याने घरांच्या किमती वाढल्या आहेत.

बाळकूम गृहप्रकल्पात १९७ घरे आहेत. यातील १२५ घरांचा समावेश कोकण मंडळाने २०१८ च्या ९०१८ घरांच्या सोडतीत केला होता. तसेच ज्या भूखंडावर ही इमारत उभारण्यात आली आहे, तेथे एक गृहयोजना राबविण्यात येणार होती. यासाठी अंदाजे ७६ लाभार्थ्यांकडून १० टक्के रक्कम भरून घेण्यात आली होती. मात्र ही योजना आकाराला आलीच नाही, त्यामुळे या जागेवर घरांचे काम सुरू झाल्यानंतर २०१८ मध्ये यातील घरे या लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यासाठी ६९ लाभार्थी पात्र ठरवले. या पार्श्वभूमीवर या गृहप्रकल्पात १२५ विजेते आणि ६९ लाभार्थाना घर देण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१८ च्या सोडतीनुसार ७२१.८३ चौ. फुटांच्या घरासाठी ४३ लाख ४५ हजार, २३६ रुपये अशी किंमत निश्चित करण्यात आली.

 सोडत होऊन बराच काळ झाला तरी घराचा ताबा मिळत नसल्याने विजेते-लाभार्थी कोकण मंडळाकडे पाठपुरावा करत होते. अखेर या विजेत्यांच्या-लाभार्थ्यांच्या हातात आता देकार पत्र पडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र देकार पत्र पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या घरांच्या किमतीत थेट १६ लाख २९ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता ही रक्कम कशी भरायची असा प्रश्न विचारत त्यांनी म्हाडाच्या या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. तसेच घरांच्या किमती कमी करण्याची मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोडतीच्या जाहिरातीत बाळकूम प्रकल्पातील वाहनतळासाठीचा खर्च योजनेतील लाभार्थ्यांना करावा लागेल किंवा खर्च म्हाडास द्यावा लागेल असे स्पष्टपणे नमूद केले होते. त्यानुसार कोकण मंडळाकडून १९ कोटी ४१ लाख ५४ हजार ७७५ रुपये खर्च करून वाहनतळ उभारण्यात येत आहे. तर ठाणे महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात न आल्याने मंडळाने स्वखर्चातून पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्याच वेळी मेट्रो उपकरही भरण्यात आला आहे. हा खर्च आणि मंडळाकडून आकारण्यात येणारे व्याज लक्षात घेता प्रति सदनिका १६ लाख २९ हजार ५६४ रुपये घरांच्या किमतीत वाढ झाल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. महत्त्वाचे म्हणजे किमतीत वाढ होईल असे स्पष्टपणे नमूद करण्यात आल्याने आता ही रक्कम भरणे क्रमप्राप्त असल्याची भूमिका कोकण मंडळाने घेतली आहे.

सरकारला साकडे

घरांच्या किमतीत वाढ होईल असे जाहिरातीत नमूद होते. मात्र ४० टक्क्यांनी वाढ करणे योग्य नाही. ही किंमत आम्हाला परवडणारी नाही. त्यामुळे घराची किंमत कमी करावी.  – मनीष सावंत, विजेते, बाळकुम