लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २,२६४ घरांच्या सोडतीसाठी अर्ज विक्री – स्वीकृतीची प्रक्रिया २६ डिसेंबर रोजी संपुष्टात येणार होती. मात्र या प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज विक्री – स्वीकृतीला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने सोमवार, २३ डिसेंबरपर्यंत २,२६४ घरांसाठी अनामत रक्कमेसह केवळ १३ हजार ७२८ अर्ज सादर झाल्याने अर्ज विक्री – स्वीकृतीला १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

कोकण मंडळाने २० टक्के योजनेतील ५९४, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ७२८, १५ टक्के योजनेतील ८२५ घरांसह विखुरलेली ११७ घरे अशा एकूण २,२६४ घरांसाठी ११ ऑक्टोबरपासून अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली. सोडतीच्या वेळापत्रकानुसार अर्ज विक्रीची मुदत १० डिसेंबर रोजी संपुष्टात येणार होती. मात्र ९ डिसेंबरपर्यंत अनामत रक्कमेसह अंदाजे पाच हजार अर्ज सादर झाल्याने अर्ज विक्री – स्वीकृतीस मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यानुसार या प्रक्रियेला २६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज भरण्यासआठी २४ डिसेंबरची, तर अनामत रक्कमेसह संगणकीय पद्धतीने, तसेच आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अर्ज भरण्यासाठी २६ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली. या मुदतवाढीत अर्ज विक्री – स्वीकृती वाढेल, घरांच्या विक्रीसाठीच्या म्हाडाच्या विशेष मोहिमेचा फायदा होईल, अशी मंडळाला आशा होती. मात्र अद्यापही अर्ज विक्री – स्वीकृतीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.

आणखी वाचा-मुंबई : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोडतीच्या अर्ज विक्री – स्वीकृतीच्या उपलब्ध आकडेवारीनुसार सोमवारपर्यंत (२३ डिसेंबर, दुपारी २ दोन वाजेपर्यंत) २२६४ घरांसाठी २३ हजार ५५१ इच्छुकांनी अर्ज भरले. तर यापैकी केवळ १३ हजार ७२८ अर्जदारांनी अनामत रक्कमेचा भरणा केला आहे. प्रत्यक्ष सोडतीसाठी आतापर्यंत केवळ १३ हजार ७२८ अर्ज आले असून ही संख्या बरीच कमी आहे. त्यामुळे अर्ज विक्री – स्वीकृतीला पुन्हा, दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. यासंबंधीची अधिकृत घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. मंडळाच्या निर्णयानुसार ६ जानेवारीपर्यंत अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू राहणार आहे. यासंबंधीचे नवीन वेळापत्रकही मंगळवार, २४ डिसेबर रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. दरम्यान सोडतीच्या मुळ वेळापत्रकानुसार २७ डिसेंबरला सोडत जाहीर होणार होती. मात्र अर्ज विक्री – स्वीकृतीला २६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने सोडत २१ जानेवारीपर्यंत पुढे गेली. आता पुन्हा दुसऱ्यांदा अर्ज विक्री – स्वीकृतीला मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र यावेळी सोडतीच्या तारखेत कोणाताही बदल करण्यात आला नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे २१ जानेवारी रोजी सोडत पार पडेल. दरम्यान, सोडतीच्या तारखेतही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.