मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार – बोळींज, खोणी, शिरढोण, गोठेघर, भंडार्ली येथील विक्री होत नसलेली घरे विकण्यासाठी आता मंडळाने नवीन शक्कल लढवली आहे. सोडत न काढता, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वाने घरांची विक्री न करता आता थेट इच्छुकांना १३ हजार ३९५ घरांपैकी हवे ते घर निश्चित करून घर खरेदी करता येणार आहे.

‘बुक माय शो’च्या धर्तीवर ‘बुक माय होम’ अशी संकल्पना मांडून रिक्त घरांच्या विक्रीसाठी मंडळाने आता नवे व्यासपीठ तयार केले आहे. ‘बुक माय होम’ नावाने https://bookmyhome.mhada.gov.in/ असे नवीन संकेतस्थळ तयार करण्यात आले असून हे संकेतस्थळ बुधवारपासून कार्यान्वित झाले आहे. या संकेतस्थळावर इच्छुकांनी रिक्त घरांपैकी आपल्याला हवे ते घर खरेदी करता येणार आहे. अर्थात थेट घर विकत घेता येणार आहे. सोडत वा प्रथम प्राधान्य योजनेत अर्ज करण्याची आता गरज नाही.

विरार – बोळींजमधील म्हाडाच्या सर्वात मोठ्या गृहप्रकल्पातील घरांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळात नाही. अनेक कारणांनी या प्रकल्पातील घरे विक्रीवाचून रिक्त आहेत. या घरांसह पंतप्रधान आवास योजनेतील घरांनाही प्रतिसाद मिळत नसल्याने रिक्त घरांमध्ये खोणी, शिरढोण, गोठेघर, भंडार्लीमधील घरांची भर पडली. आजघडीला कोकण मंडळाची १३ हजार ३९५ घरे विक्रीवाचून धूळ खात पडून आहेत.

दरम्यान, रिक्त घरांची विक्री करण्यासाठी मंडळाने अनेक कसरती केल्या. जाहिरात प्रसिद्ध केली, रेल्वे स्थानकाबाहेर स्टाॅल लावून घरे विकण्याचा प्रयत्न केला. प्रथम प्राधान्य योजना राबविली. मात्र तरीही म्हणावी तितकी घरे विकली गेली नाहीत. त्यामुळे आता कोकण मंडळाने नवीन शक्कल लढवली आहे.

‘बुक माय शो’च्या धर्तीवर ‘बुक माय होम’ अशी संकल्पना मंडळाने मांडली आणि त्यानुसार आता ‘बुक माय होम’ संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते बुधवारी या संकेतस्थळावरील अर्ज नोंदणीस सुरुवात करण्यात आली.

म्हाडाच्या सोडतीच्या प्रणालीनुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील सोडतीत सहभागी होणाऱ्या अर्जदारांना उपलब्ध घरांपैकी कोणते घर मिळणार याबाबत कोणतीही निश्चिती नव्हती. सोडतीनंतरच ते निश्चित होत होते. त्यामुळेही इच्छुक घर घेण्यासाठी पुढे येत नव्हते. पण आता मात्र इच्छुकांना, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘बुक माय होम’ संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे अर्जदारांना आता विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या घरांपैकी आवडीचे घर निवडून ते खरेदी करता येणार आहे. विरार बोळींज, खोणी, शिरढोण, गोठेघर, भंडार्ली येथील १३ हजार ३९५ घरे बुक माय होम अंतर्गत ग्राहकांना, इच्छुकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णतः ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या नवीन संकेतस्थळावरील प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण करते वेळी आधार कार्ड, पॅन कार्डची छायांकित प्रत, स्वयंघोषणापत्र आदी बाबी ऑनलाईन संकेतस्थळावर अपलोड करावयाच्या आहेत. अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर या कागदपत्रांची कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय संगणकीय पद्धतीने पडताळणी होणार आहे.

सदर पडताळणीनंतर अर्जदाराचे प्रोफाइल तयार होणार आहे. अर्जदाराचे प्रोफाइल तयार झाल्यानंतर अर्जदारास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील मंडळनिहाय उपलब्ध सदनिकांची माहिती घराच्या क्रमांकासह मिळणार आहे. अर्जदारास या सदनिकांमधून मजला व सदनिका आपल्या पसंतीनुसार निवडता येणार आहे. दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असलेल्या सदनिकांव्यतिरिक्त इतर सदनिकांसाठी पात्रतेच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. तसेच उत्पन्न गटाचे कुठलेही निकष ठेवण्यात आलेले नाहीत.

सदर सदनिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या संवर्गांसाठी सदनिका आरक्षण ठेवण्यात आल्याचेही कोकण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. आता रिक्त घरासाठीच्या या नवीन प्रयोगास कसा प्रतिसाद मिळतो आणि किती घरे विकली जातात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.