मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीच्या प्रतिक्षेतील मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळणार आहे. दिवाळीपूर्वी, अर्थात आॅक्टोबरमध्ये मंबईतील ५ हजार घरांसाठी सोडत काढण्याचे नियोजन मुंबई मंडळाने केले आहे. सोडतीची, सोडतीतील घरांची संख्या जाहीर करण्यात आली असली तरी घरे कोणत्या परिसरात, कोणत्या उत्पन्न गटासाठी असणार याचे तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.
मुंबईतील म्हाडाच्या घरांना सर्वाधिक मागणी असते. त्यामुळेच मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या सोडतीला मोठ्या संख्येने अर्ज सादर होतात. त्यातही अत्यल्प आणि अल्प गटातील घरांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. मुंबईसारख्या महागड्या शहरात परवडणाऱ्या दरात हक्काची घरे घेण्यासाठी सर्वसामान्यांना म्हाडा हाच एकमेव पर्याया आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष म्हाडाच्या घरांच्या सोडतीकडे लागले असते.
दरम्यान २०१८ नंतर मुंबई मंडळाने थेट २०२३ मध्ये ४०८२ घरांसाठी सोडत काढली होती. या सोडतीत अत्यल्प आणि अल्प गटासाठी सर्वाधिक घरे होती. त्या सोडतीली उत्तम प्रतिसाद मिळाल. २०२४ मध्येही काही घरांसाठी सोडत काढण्यात आली. आता दिवाळीपूर्वी मुंबईतील घरांसाठी सोडत काढण्यात येईल आॅक्टोबरमध्ये ५ हजार घरांसाठी सोडत होईल असे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
ही ५ हजार घरे नेमकी कुठे असतील, कोणत्या उत्पन्न गटासाठी असतील याविषयी त्यांना विचारले असता त्यांच्याकडून कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मुंबई मंडळात सध्या काम सुरु असलेली आणि येत्या वर्षभरात पूर्ण होणारी घरे ५ हजार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या पाच हजार घरांमध्ये वर्षभरात पूर्ण होणाऱ्या घरांसह पत्राचाळीतील निर्माणाधीन घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. पत्राचाळीत सध्या अल्प, मध्यम आणि उच्च गटासाठी २३८९ घरांची कामे सुरु आहेत. ती पूर्ण होण्यासाठी चार वर्षांचा अवधी लागणार आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर २०२५ च्या सोडतीत या घरांचीही समावेश होण्याची शक्यता आहे.
१५ कोटी कागदपत्रे होणार सार्वजनिक
माहिती अधिकाराखाली नागरिकांना, म्हाडा विजेत्यांना, भाडेकरुंना आवश्यक ती माहिती मिळवावी लागते. यात बराच वेळ जातो. तर अधिकारी-कर्मचार्यांचा ही वेळ या जातो. ही बाब लक्षात घेत म्हाडाने पारदर्शक कारभाराच्यादृष्टीने म्हाडाशी संबंधित १५ कोटी कागदपत्रे सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. स्कॅन केलेली ही कागदपत्रे म्हाडाच्या नवीन अधिकृत संकेतस्थळावर कोणालाही पाहता येतील. मात्र त्याची प्रत काढता येणार नाही किंवा त्यात काही बदलही करता येणार नाही. म्हणजेच ही कागदपत्रे केवळ वाचनासाठी असतील. संवेदशनील विषयाची संबंधित कागदपत्रांचा मात्र यात समावेश नसणार आहे. त्याचवेळी म्हाडाच्या सर्व मंडळांच्या माहितीसह प्रकल्पांची माहिती, इतर माहितीही आता संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.