मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने गुरुवारी, २४ एप्रिल रोजी बृहतसूचीवरील म्हणजेच मास्टरलिस्टवरील १७८ घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. या १७८ घरांच्या सोडतीत १०० अर्जदार सहभागी होणार आहेत. तर संगणकीय पद्धतीने काढण्यात येणारी बृहतसूचीवरील घरांसाठीचीही दुसरी सोडत असणार आहे.

डिसेंबर २०२३ च्या सोडतीत गैरप्रकार

दक्षिण मुंबईतील जुन्या, मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतीपैकी अतिधोकादायक आणि कोसळलेल्या इमारतीतील मूळ भाडेकरूंना दुरूस्ती मंडळाच्या संक्रमण शिबिरात हलविण्यात येते. या मूळ भाडेकरूंच्या इमारतींचा पुनर्विकास झाल्यानंतर ते आपल्या हक्काच्या घरात राहावयास जातात. मात्र मोठ्या संख्येने कोसळलेल्या वा अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास होत नाही. अशावेळी मोठ्या संख्येने मूळ भाडेकरूंना कायम संक्रमण शिबिरातच राहावे लागते आणि त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न धूसर होते. ही बाब लक्षात घेता म्हाडाने ज्या इमारतींचा कोणत्याही कारणाने कधीच पुनर्विकास होऊ शकणार नाही अशा इमारतीतील मूळ भाडेकरूंना हक्काची घरे देण्यासाठी बृहतसूची म्हणजेच मास्टरलिस्ट तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अशा मूळ भाडेकरूंकडून अर्ज मागवून त्यांच्या अर्जांची छाननी करायची आणि पात्र अर्जदारांना सोडतीद्वारे घरे द्यायचे अशी ही बृहतसूचीची प्रक्रिया आहे. दुरुस्ती मंडळाला उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्विकासाद्वारे विकासकांकडून जी अतिरिक्त घरे मिळतात ती या मूळ भाडेकरूंना वितरीत केली जातात.

आतापर्यंत अशा शेकडो घरांचे वितरण दुरुस्ती मंडळाकडून करण्यात आले आहे. मात्र बृहतसूचीवरील घरांच्या वितरणात मोठा गैरप्रकार होत असल्याचा आरोप होत असून अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे अखेर म्हाडा प्राधिकरणाने पारदर्शकता यावी यासाठी ही सोडत संगणकीय पद्धतीने काढण्याचा निर्णय घेतला.

चौकशी अहवालाची प्रतीक्षाच

म्हाडाच्या या निर्णयाप्रमाणे डिसेंबर २०२३ मध्ये संगणकीय पद्धतीने पहिली सोडत काढण्यात आली. २६५ घरांसाठी काढण्यात आलेल्या या संगणकीय सोडतीतही गैरप्रकार झाला. त्यानंतर त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून अद्याप चौकशीचा अहवाल मंडळाने सार्वजनिक केलेला नाही किंवा या चौकशीत अपात्र वा दोषी आढलेल्यांविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. आता दुरुस्ती मंडळाने दुसऱ्या सोडतीचा घाट घातला आहे. दुसऱ्या सोडतीसाठी मंडळाने १५ ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान संक्रमण शिबिरार्थींकडून अर्ज मागविले होते. त्यानुसार सोडतीसाठी १०० अर्ज पात्र ठरल्याने आता १०० अर्जदारांचा समावेश करून गुरुवार, २४ एप्रिल रोजी म्हाडा भवनात म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती दुरुस्ती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या सोडतीत १७८ घरांचा समावेश असणार असून ही घरे माझगाव, गिरगाव, वडाळा, दादर, माहिम आदी परिसरातील असणार आहेत. तर ३०० ते ७५० चौरस फुटांची ही घरे आहेत.

पहिल्या सोडतीतील दोषींविरोधात आधी कारवाई करा

डिसेंबर २०२३ च्या सोडतीत मोठा गैरप्रकार झाला असून यासंबंधी म्हाडा उपाध्यक्षांकडे रितसर तक्रार केली होती. त्यानुसार त्यांनी चौकशी करावी. मात्र याला दीड वर्षे होत आले तरी चौकशी अहवाल सार्वजनिक झालेला नाही किंवा दोषींविरोधात कारवाई झालेली नाही. त्यामुळे दुसऱ्या सोडतीत बनावट कागदपत्राद्वारे घरे लाटण्याचा प्रयत्न झाला तर त्याला जबाबदार कोण. म्हाडाने घाई न करता आधी पहिल्या सोडतीतील दोषींविरोधात कारवाई करावी, त्यानंतर दुसरी सोडत काढावी आणि यावेळी कागदपत्रांची योग्य, बारकाईने छाननी करावी. – अभिजित पेठे, अध्यक्ष, ट्रान्झिट कॅम्प असोसिएशन