मुंबई: म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ५०२ घरांच्या सोडतीची अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली आहे. या प्रक्रियेनुसार सोडतीतील घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. एकूण ५०२ घरांसाठी अनामत रक्कमेसह केवळ १०२५ अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान एकीकडे सोडत प्रक्रिया संपुष्टात आली असली तरी सोडतीची तारीख अद्याप नाशिक मंडळाकडून जाहिर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या १०२५ अर्जदारांना सोडतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नाशिकमधील मखमलाबाद शिवार, सातपूर शिवार, पाथर्डी शिवार, विहितगाव शिवार, हिरावाडी, म्हसरुळ शिवार, तपोवन द्वारका, वडाळा नाशिक शिवार, पिंपळगाव बहुला, नांदुर दसक, देवळाली, मौजे दसक या ठिकाणच्या ५०२ घरांसाठी नाशिक मंडळाने सोडत जाहीर केली आहे. त्यात २९१ घरे २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील तर २०२ घरे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेतील आहेत. या ५०२ घरांसाठी ७ फेब्रुवारीपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली होती. अर्जविक्री-स्वीकृतीची ही प्रक्रिया ६ मार्चला संपुष्टात येणार होती. मात्र सोडतीला म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने या प्रक्रियेस २१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया संपली असून सोडतीतील घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. उपलब्ध माहितीनुसार २० टक्के योजनेतील २९१ घरांसाठी अनामत रक्कमेसह ८४० अर्ज सादर झाले आहेत. म्हाडा गृहनिर्माण योजनेतील सात घरांसाठी ५६, प्रथम प्राधान्य योजनेतील २०२ घरांसाठी १२३ आणि उर्वरित दोन घरांसाठी ६ अर्ज सादर झाले आहेत.

सोडतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असतानाच दुसरीकडे सोडतीची तारीख अद्याप मंडळाकडून जाहिर करण्यात आलेली नाही. फेब्रुवारीत सोडतीचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले त्यावेळीही सोडतीची तारीख जाहिर करण्यात आली नव्हती. आता सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, सोडतीची तारीख अंतिम करण्यात न आल्याने अर्जदार संभ्रमात आहेत. दरम्यान सोडतीत सहभागी होणाऱ्या पात्र अर्जांची यादी ९ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता जाहिर केली जाणार आहे. त्यामुळे ९ एप्रिलनंतरच सोडत काढली जाणार आहे. सोडतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. १५ ते २० एप्रिलदरम्यानची वेळ मिळविण्याचे हे प्रयत्न आहेत. त्यामुळे १५ ते २० एप्रिलदरम्यान सोडत होण्याची शक्यता आहे.