मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध ठिकाणच्या १४९ दुकानांच्या ई लिलावासाठी सुरू केलेली नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया संपुष्टात आली असून या मुदतीत १४९ दुकानांसाठी केवळ ४५१ अर्ज दाखल झाले आहेत. हा प्रतिसाद अत्यल्प मानला जात आहे. दरम्यान, आता अर्जदारांना गुरुवारी बोली लावता येणार असून शुक्रवारी ई लिलावाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

म्हाडाच्या काही गृह प्रकल्पांमध्ये रहिवाशांच्या सुविधेसाठी दुकाने बांधण्यात येतात. या दुकानांची विक्री ई लिलावाद्वारे केली जाते. त्यानुसार मुंबई मंडळाने १२ ऑगस्टपासून १४६ दुकानांच्या ई लिलावासाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात केली होती. मात्र अर्जविक्री-स्वीकृतीला कमी प्रतिसाद मिळाल्याने मुंबई मंडळाने या प्रक्रियेला मुदतवाढ दिली होती. त्यानुसार अर्ज भरण्याची, सादर करण्याची मुदत मंगळवारी संपुष्टात आली. या विहित मुदतीत १४९ दुकांनासाठी ११०० इच्छुकांनी नोंदणी केली होती, तर ६३२ जणांनी कागदपत्रांसह अर्ज दाखल केला होता. या ६३२ जणांपैकी केवळ ४५४ जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे आता ई लिलावात ४५४ जण स्पर्धेत असणार आहे.

मुदतवाढ देऊनही दुकानांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, गेल्या वर्षी मुंबई मंडळाने १७३ दुकानांचा ई लिलाव केला होता. मात्र यावेळी केवळ ४९ दुकाने विकली गेली होती, तर १२४ दुकाने विक्रीवाचून रिक्त राहिली होती. या रिक्त दुकानांमुळे मंडळाचा कोट्यवधीचा महसूल अडकल्याने मंडळाने रिक्त १२४ दुकानांसह नवीन २५ अशा एकूण १४९ दुकानांसाठी ऑगस्टमध्ये ई लिलाव जाहीर केला.

१७३ दुकानांच्या ई लिलावातील दुकाने महाग असल्याने त्यांना प्रतिसाद मिळाला नसल्याचे नंतर केलेल्या अभ्यासातून समोर आले होते. त्यामुळे १४९ दुकानांच्या ई लिलावात जुन्या दुकानांच्या बोली किंमतीत आणि वापरासंबंधीच्या अटींमध्ये बदल करण्यात आला होता. मात्र यानंतरही या दुकानांच्या विक्रीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.

मुंबईतील १४९ दुकानेही महाग असल्याने त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर यावेळीही काही दुकाने रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ई लिलावाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर किती दुकाने विकली जातात, किती रिक्त राहतात हे स्पष्ट होईल.