स्वस्तात ‘म्हाडा’चे घर मिळवून देण्याचे आश्वासन देऊन सहा जणांना सुमारे ६० लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या सचिन कानल (३४) आणि सचिन चिकले (२८) या दोघांना चुनाभट्टी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून घराच्या व्यवहाराची बनावट कागदपत्रे, मुद्रांक हस्तगत करण्यात आले आहेत.
राजन राऊळ (४६) हे टपाल खात्यात कारकून म्हणून काम करतात. त्यांना या दोघांनी ३०० चौरस फुटांचे ‘म्हाडा’चे घर दाखवले आणि ते स्वस्तात मिळेल, असे आश्वासन दिले. आयुष्यभर झोपडपट्टीत राहिल्यानंतर आता पक्क्या घरात राहण्याच्या कल्पनेतून राऊळ यांनी या दोघांना आधी तीन लाख रुपये आणि नंतर दोन लाख रुपये रोख दिले. पैसे मिळाल्यानंतर कानल आणि चिकले यांनी घराची काही कागदपत्रे राऊळ यांना दिली. पण पैसे देऊन तीन वर्षे उलटल्यानंतरही घर मिळाले नाही, तेव्हा आपण फसवले गेल्याचे राऊळ यांच्या लक्षात आले. त्यानंतर राऊळ यांनी चुनाभट्टी पोलिस ठाण्यात कानल आणि चिकले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी टिळक नगर येथील म्हाडा वसाहतीमधील एका घरात ‘म्हाडा’च्या घरांच्या व्यवहाराबाबतचे बनावट कागदपत्रे, मुद्रांक अशा मुद्देमालासह दोघा आरोपींना अटक केली. राऊळ यांच्याबरोबरच त्यांच्या मित्रांनीही या दोघांना ‘म्हाडा’च्या घरासाठी पैसे दिले होते. ही एकूण रक्कम ६० लाख रुपयांच्या घरात आहे.
पोलिसांनी कानल आणि चिकले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात ‘म्हाडा’चे अधिकारी-कर्मचारीही सामील आहेत काय याचा पोलिस शोध घेत आहेत.