मुंबई : म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाने ५३ व्यावसायिक, अनिवासी भूखंडांच्या विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या भूखंडांचा ई लिलाव करण्यात येणार असून या ई लिलावासाठीच्या नोंदणी, अर्जविक्री आणि अर्जस्वीकृती प्रक्रियेला २ जूनपासून सुरुवात होणार आहे. या ई लिलावाचा निकाल ८ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या ई लिलावाद्वारे छत्रपती संभाजीनगरमध्ये परवडणाऱ्या दरात अनिवासी भूखंड खरेदीची संधी इच्छुकांना उपलब्ध होणार आहे.
म्हाडाच्या विविध मंडळाकडून निवासी भूखंडांसह अनिवासी भूखंडांची विक्री केली जाते. बाजारभावाच्या तुलनेत म्हाडाच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात भूखंड खरेदी करता येत असल्याने म्हाडाच्या भूखंडांच्या ई लिलावाला चांगला प्रतिसाद मिळतो. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर मंडळाने आपल्या अखत्यारितील ५३ अनिवासी भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या ५३ भूखंडांच्या ई लिलावासाठी नुकतीच मंडळाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांनी दिली. या जाहिरातीनुसार २ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. तर ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांना संगणकीय (ऑनलाईन) बोली स्वरुपात ई लिलाव होईल. म्हाडाच्या http://www.eauction.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर हा ई लिवाव होईल.
ई लिलाव झाल्यानंतर ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता https://mhada.gov.in आणि http://www.eauction.mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही आवळकंठे यांनी दिली. http://www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर इच्छुकांना नोंदणी, अर्ज भरणे, अर्ज सादर करणे, कागदपत्र जमा करणे, अनामत रक्कम भरणे आदी प्रक्रिया करता येणार आहे. तर आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा २ जुलैपर्यंत संबंधित बँकांच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे. ई लिलावाबाबत विस्तृत पात्रता निकष, प्रत्येक भूखंडाचे विवरण, भूखंडाचे आरक्षण व अर्ज करण्याची कार्यपद्धती, सविस्तर अटी – शर्ती, ऑनलाईन अर्ज सूचना, महितीपुस्तिका याबाबतची माहिती http://www.eauction.mhada.gov.in आणि mhada.gov.in या संकेतस्थळावरील Lottery>;Eauction>;eauction या पोर्टलवर उपलब्ध आहे. दरम्यान, अर्जदाराने संकेतस्थळावरील व माहिती पुस्तिकेतील सविस्तर सर्व अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावा. अर्जदारास छपाईबाबतच्या कोणत्याही चुकीचा फायदा घेता येणार नाही, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.