MHADA Diwali Lottery Draw Delayed : म्हाडाच्या मुंबई मंडळाने दिवाळीत पाच हजार घरांसाठी सोडत काढण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर दिवाळीत जाहिरात प्रसिद्ध करून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला सुरुवात करणे अपेक्षित आहे. मात्र आतापर्यंत सोडतीच्या तयारीला सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे दिवाळीतील सोडतीचा मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुरेशी घरे उपलब्ध नसल्याने यंदा सोडत जाहीर होईल की नाही अशी चर्चाही म्हाडाकार्यालयात सुरू आहे.
मुंबईतील घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे परवडणाऱ्या दरात मुंबईतील हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांना म्हाडाचा आधार असतो. त्यामुळे मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीला नेहमीच प्रचंड प्रतिसाद मिळतो. तर मुंबई मंडळाच्या सोडतीकडे इच्छुकांचे डोळे लागले असतात. साधारणत २००७ पासून २०१९ पर्यंत सलग मुंबईतील घरांसाठी सोडत काढण्यात आली. पण त्यानंतर मात्र २०२० – २०२२ दरम्यान सोडत निघाली नाही.
घरे नसल्याने, करोनाचा काळ असल्याने सोडतीची मालिका खंडीत झाली. पण २०२३ आणि २०२४ मध्ये मुंबई मंडळाने सोडत काढली. तर २०२५ मधील सोडतीची घोषणा साधरणत फेब्रुवारी २०२५ मध्ये करण्यात आली होती. दिवाळीत पाच हजार घरांची सोडत काढण्याची ही घोषणा होती. या घोषणेनुसार दिवाळीत जाहिरात प्रसिद्ध करून नोंदणी, अर्जविक्री – स्वीकृतीला सुरुवात करण्यात येणार होती. दिवाळी महिन्याभरावर आली आहे. मात्र मुंबई मंडळाकडून अद्यापही घरांची शोधाशोध सुरू झालेली नाही, अशी माहिती मुंबई मंडळातील सूत्रांनी दिली. त्यामुळे दिवाळीत सोडत निघणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दिवाळीत पाच हजार घरांची सोडत काढण्याचे जाहीर करताना म्हाडाने यात पत्राचाळीतील चालू प्रकल्पातील अंदाजे २५०० घरांचा समावेश केला होता. मात्र या घरांच्या कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. पर्यावरणासंबंधीच्या परवानग्या मिळाल्यानंतर या घरांच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे काम सुरू होण्याआधी ही घरे सोडतीत समाविष्ट करणे मुंबई मंडळाला अडचणीचे ठरत आहे. तर दुसरीकडे सोडतीसाठी पुरेशी घरे नसल्यानेही मंडळाची अडचण होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिवाळीत पाच हजार घरांची सोडत काढण्याच्यादृष्टीने तयारीस सुरुवात झाली आहे का याविषयी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही.