मुंबई : दोन वेळा सीईटी परीक्षा घेऊनही बीबीए, बीएमएस, बीसीए या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या फेरीत बीबीए-बीएमएस आणि बीसीएसाठी ३२ हजार ३८१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. मात्र त्यातील फक्त २३ हजार ६९० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. दरम्यान, राज्यात या अभ्यासक्रमांसाठी एक लाखांपेक्षा अधिक जागा उपलब्ध आहेत.

बीबीए, बीसीए, बीएमएस हे अभ्यासक्रम मागील दोन वर्षांपासून एआयसीटीईच्या अखत्यारित आले. त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेणे अनिवार्य झाले. गेल्या वर्षी अचानक झालेल्या निर्णयामुळे या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेबाबतची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली नाही. त्यामुळे गतवर्षी दोन वेळा सीईटी घेण्यात आली होती.

मात्र यंदा घेण्यात आलेल्या सीईटीला ६८ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. त्यानंतर काही विद्यार्थ्यांची आणि प्रामुख्याने संस्था चालकांची मागणीनुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दुसऱ्यांदा सीईटी घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सीईटी कक्षाने यंदाही दुसऱ्यांदा परीक्षा घेतली. या दोन्ही सीईटीनंतर बीबीए-बीएमएस आणि बीसीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची पहिली फेरी नुकतीच पार पडली. या पहिल्या फेरीत बीबीए-बीएमएससाठी १६ हजार ३८७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती.

त्यापैकी ११ हजार ३९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. बीसीए अभ्यासक्रमासाठी १५ हजार ९९४ विद्यार्थ्यांना जागा मिळाल्या होत्या. पण त्यापैकी १२ हजार २९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दुसऱ्यांदा सीईटी घेतल्याने प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

बीबीए, बीसीए, बीएमएस आदी अभ्यासक्रमांसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी विविध विद्यापीठांनी सुरू केलेल्या बीकॉम इन बिझनेस मॅनेजमेंट, बीकॉम इन मॅनेजमेंट स्टडीज आदी अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे आता या लांबलेल्या प्रवेश फेरीकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. परिणामी दोन-दोन सीईटी घेऊन नेमका कोणाचा फायदा झाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.