मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) राबवण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यात विधि-३ वर्षे, बीएड-एमएड, एमएड, बीएड, बीपीएड, एमपीएड या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांसाठी अर्ज नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

सीईटी कक्षाने विधि-३ वर्षे अभ्यासक्रमासाठी २ आणि ३ मे रोजी एकूण पाच सत्रांमध्ये प्रवेश परीक्षा घेतली होती. ही परीक्षा राज्यातील केंद्रांसोबतच राज्याबाहेरी केंद्रांवरही झाली होती. राज्यभरातून या परीक्षेसाठी ९४ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७४ हजार ६२१ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित होते. ही उपस्थिती ७८.९६ टक्के एवढी होती.

या सीईटीचा निकाल २० जून रोजी जाहीर करण्यात आला. त्यात पाच जणांनी १०० पर्सेंटाइल मिळवत चमक दाखवली. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज नोंदणी सुरू असून सीईटी कक्षाने सोमवार, २१ जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत दिली आहे. तर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी २५ जुलैपर्यंतची मुदत आहे.

बीएड-एमएड या अभ्यासक्रमासोबतच बीएड, एमएड, एमपीएड, बीपीएड या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षाही मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत घेण्यात आल्या. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीही अर्ज नोंदणी सुरू असून त्यासाठी आता सीईटी कक्षाने २५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर २९ जुलैपर्यंत दाखल झालेल्या अर्जांसोबतच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे पुढील वेळापत्रक अर्ज नोंदणीची अंतिम मुदत संपल्यानंतर जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही सीईटी कक्षाने केले आहे.