मुंबई : राज्यातील व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) विविध १२ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी सुरू केली. चार दिवसांमध्ये या १२ अभ्यासक्रमांसाठी २ लाख ९ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी ८१ हजार ८०७ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केला आहे. अर्ज निश्चित करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अंतिम यादीमध्ये समावेश करण्यात येणार आहे.
सीईटी सेलकडून मार्च – एप्रिलमध्ये तब्बल १८ हून अधिक विविध प्रवेश परीक्षा (सीईटी) पार पडल्या. त्यांचे निकाल मे महिन्यात व जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर झाले. यानंतर आता प्रवेश नोंदणीला सुरुवात झाली. अर्ज प्रक्रिया, गुणवत्ता यादी, फेऱ्या प्रवेश अशी प्रक्रिया होणार आहे. आता नोंदणीला सुरुवात झाली असून ८ दिवस प्रवेश नोंदणीची मुदत देण्यात आली आहे.
आतापर्यंत सर्वाधिक नोंदणी बीई / बीटेक या अभियंत्रिकी अभ्यासक्रमासाठी झाली असून तब्बल १ लाख ३७ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी ४७ हजार ३२७ विद्यार्थ्यांनी शुल्क भरुन प्रवेशासाठी अर्ज निश्चित केला आहे. तर बॅचलर ऑफ एज्युकेशन (बीएड) या अभ्यासक्रमासाठी ३४ हजार २६९ नोंदणींपैकी १९ हजार ६९विद्यार्थ्यांचा अर्ज अंतिम केला आहे. गेल्या काही दिवसांपासून विधि अभ्यासक्रमाला विद्यार्थांची पसंती वाढली आहे.
विधि तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी १९ हजार ७३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यापैकी ५ हजार ४५५ प्रवेश अर्ज अंतिम केल आहेत. पाच वर्ष विधि अभ्यासक्रमांसाठी १२ हजार ८०४ नोंदणींपैकी ८ हजार २३४ विद्यार्थ्यांनी अर्ज आतापर्यंत अंतिम केले आहेत.
बॅचलर ऑफ एज्युकेशनसाठी (बीएड) ३४ हजार २६९ पैकी १९ हजार ६९ विद्यार्थ्यांनी, मास्टर ऑफ एज्युकेशनमध्ये (एमएड) १ हजार ४०६ पैकी ७८१ विद्यार्थ्यांनी बुधवारपर्यंत अर्ज अंतिम केले. एमडीएस (पोस्ट ग्रॅज्युएशन इन डेंटल) अभ्यासक्रमासाठी ३,००८ पैकी केवळ ७४९ विद्यार्थ्यांनी अर्ज अंतिम केले आहेत. यामध्ये आणखी प्रवेश नोंदणी वाढण्याची शक्यता आहे. यानंतर लवरकरच प्रवेश सुरू केले जाणार असल्याचे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले.
बुधवारपर्यंत झालेली नोंदणी
अभ्यासक्रम / नोदणी / अंतिम अर्ज
- बीई/टेक / १,३७,९२४ / ४७,३२७
- बीएड / ३४,२६९ / १९,०६९
- एलएलबी – ३ वर्षे / १९,७३५ / ५,४५५
- एलएलबी – ५ वर्षे / १२,८०४ / ८,२३४
- एमएड / १,४०६ / ७८१
- एमडीएस / ३,००८ / ७४९
- बी. डिझाईन / १८१ / ६५
- बीएड,एमएड / २६३ / १२७
- एमई,एमटेक / ८२ / ०