मुंबई : अभियांत्रिकी अभ्याक्रमाची अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीसंदर्भात हरकती व तक्रारी नोंदविण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) २२ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच अंतिम गुणवत्ता यादी २४ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी २ लाख १३ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
सीईटी कक्षातर्फे अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा यंदा १९ ते २७ एप्रिल या कालावधीत विविध सत्रांमध्ये घेण्यात आली. अखेरच्या सत्रामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये काही प्रश्न चुकीचे असल्यासंदर्भात विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्यामुळे त्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी ५ मे रोजी अतिरिक्त प्रवेश परीक्षा घेण्यात आली. एमएचटी सीईटीच्या भौतिकशास्त्र, रसानयशास्त्र आणि गणित (पीसीएम) गटासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४ लाख २२ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल १६ जून रोजी जाहीर करण्यात आला.
त्यानंतर सीईटी कक्षातर्फे २७ जून रोजी अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार ३० जून ते १४ जुलैपर्यंत अर्ज नाेंदणी प्रक्रिया, कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. या कालावधीमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी २ लाख १३ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत १९ जुलै रोजी सायंकाळी अभियांत्रिकी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतरिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर केली. या यादीवर हरकती व तक्रारी नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना २० ते २२ जुलैदरम्यान मुदत देण्यात आली आहे. हरकती व तक्रारी दूर केल्यानंतर २४ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली आहे.
बीबीए-बीसीएच्या अतिरिक्त सीईटीला ८० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
बीबीए-बीसीए या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्यभरात एक लाख आठ हजार एवढ्या जागा उपलब्ध आहेत. सीईटी कक्षाने २९ आणि ३० एप्रिल रोजी घेतलेल्या परीक्षेत ६१ हजार ६६६ विद्यार्थी उपस्थित होते. त्यामुळे संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अतिरिक्त सीईटी घेण्याचा निर्णय घेतला होता.
या अतिरिक्त सीईटीसाठी नोंदणी केलेल्या ४० हजार ६६७ विद्यार्थ्यांपैकी ३२ हजार ८३९ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. ही संख्या एकूण परीक्षार्थींच्या ८० टक्के एवढी होती. राज्यभरात १३५ केंद्रांवर दोन सत्रांमध्ये ही परीक्षा झाली. आता एप्रिलमध्ये पहिली सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसह या नव्या विद्यार्थ्यांनाही या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा आहे.