मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद पडलेली मिनी ट्रेन लवकरच सुरु होणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी केली.

उत्तर मुंबईत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पीयूष गोयल यांनी महापालिका, जिल्हाधिकारी, एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, पोलिस अशा सर्वच विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची चौथी आढावा बैठक शनिवारी महापालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयात घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व कामांच्या प्रगतीची माहिती दिली. त्यावेळी मिनी ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली.

मिनी ट्रेनबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार वर्षभरापूर्वी सुरू झालेले मिनी ट्रेनचे काम पूर्ण होऊन दोन महिन्यात मिनी ट्रेन धावू लागेल, अशी माहिती गोयल यांनी यावेळी दिली. गोयल यांनी यावेळी उत्तर मुंबईतील विविध विकासकामांचा आढावा घेतला. रस्तेजोडणी, पूल, सागरी महामार्ग अशा प्रकल्पांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

कामचुकार अधिकाऱ्यांच्या बदल्या…

पोयसर आणि दहिसर नद्यांच्या पात्रांच्या रुंदीकरणसह नालेसफाईचे काम २५ टक्के पूर्ण झाले असून त्यासोबत उत्तर मुंबईतील चार विभाग कार्यालयांच्या अंतर्गत सुरू असलेली २१२ रस्त्यांची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी कबूल केल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले. त्याचवेळी कामचुकार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात, अशीही सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला केली.

दोन नवी पोलिस ठाणी

मालाड येथील मालवणी परिसरात अहोरात्र ट्रकद्वारे भरणी करून अतिक्रमण केले जात आहे. या ट्रकविरोधात आणि अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. कारवाई करण्यासाठी अतिरिक्त पोलिस बळ तैनात करण्यात यावे तसेच अंबुजवाडी आणि आक्सा येथे दोन नवी पोलिस ठाणी उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. उत्तर मुंबईत अकरा तलाव असून त्यात भरणी करण्यात आल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. याची दखल घेत पुढील दोन वर्षांत त्यांचे संवर्धन आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली.

चार अमृत रेल्वे स्थानके

दहिसर, बोरीवली, कांदिवली आणि मालाड या चार रेल्वे स्थानकांचा अमृत स्थानके म्हणून विकास करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्यासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आहे. सर्व स्थानकांबाहेरील फेरीवाले आणि अतिक्रमणे हटवून प्रवाशी आणि पादचाऱ्यांना दिलासा देण्यात येईल. बोरीवली स्थानकाबाहेर हे काम सुरू झाल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर मुंबईतील सर्व स्मशानभूमींची तातडीने पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याचा अहवाल येताच त्या स्मशानभूमींची डागडुजी, नूतननीकरण करण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रदूषण रोखण्यासाठी सर्व स्मशान भूमींमध्ये विद्युत दहिनीची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.