मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने कबुतरांना खाद्य टाकण्यावर निर्बंध लादले असले तरीही त्यांच्या खाण्यापिण्याची अन्य ठिकाणी सोय करावी, अशी मागणी थेट एका मंत्र्यानेच केली आहे. वांद्रे कुर्ला संकुल, रेसकोर्स, आरे कॉलनी, किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आदी मोकळ्या जागांचा कबुतरांना खाद्य देण्यासाठी तात्पुरता वापर करावा, अशी लेखी मागणी मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली.

कबुतरांची विष्ठा व पिसांमुळे श्वसनाचे अनेक आजार होत असल्याने अनेक वर्षांपासून मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार राज्य सरकारने कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन पावसाळी अधिवेशनात कबुतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मोहीम राबवावी, असे आदेश महानगरपालिका प्रशासनाला दिले. त्यानंतर महापालिकेने मुंबईतील कबुतरखाने आणि कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात असून पालिकेच्या कारवाईविरोधात रविवारी शांतिदूत यात्रादेखील काढण्यात आली. अशातच मंगलप्रभात लोढा यांनीदेखील कबुतरांच्या समस्येबाबत महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे. 

मृत कबुतरांमुळे धोका? 

शासनाने कबुतरांना खाद्य देण्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक प्रश्नांची नोंद घेतली असून काही विशिष्ट प्रकरणांमध्ये मानवी आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. असे असले तरीही, खाद्य देण्यावर निर्बंध लावल्यामुळे अनेक कबुतरे उपासमारीमुळे मृत्युमुखी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, रस्त्यांवर मृत कबुतरांची संख्या वाढत असून त्यातून दुसऱ्या प्रकारचा सार्वजनिक आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्राणी कल्याण संस्था आणि जागरूक नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

बीकेसी, रेसकोर्सचा प्रस्ताव

कबुतरांना खाद्य देणे हेच आरोग्य समस्यांचे मूळ कारण आहे का, की वाढते पर्यावरणीय प्रदूषण हे अधिक मोठे कारण आहे, असा प्रश्न लोढा यांनी नागरिकांतर्फे प्रशासनाला विचारला आहे. अनेक वर्षांची धार्मिक आणि सांस्कृतिक प्रथा असलेली ही सवय थांबवताना, महापालिकेने संबंधित घटकांशी संवाद साधला का, की हा निर्णय अचानक घेतला गेला, कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य देण्यासाठी काही पर्यायी उपाययोजना आखण्यात येत आहेत का, हे निर्बंध कायम राहणार का, असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसेच, या संपूर्ण विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी न्यायालयाच्या देखरेखीखाली एक तज्ज्ञ समिती नेमता येत असल्यास त्याचा प्राधान्याने विचार करावा. तोपर्यंत कबुतरांना खाद्य देण्यासाठी वांद्रे कुर्ला संकुल, रेसकोर्स, आरे कॉलनी, किंवा संजय गांधी नॅशनल पार्कसारख्या मोकळ्या जागांचा तात्पुरत्या वापर करावा, अशी मागणी लोढा त्यांनी नागरिकांतर्फे केली आहे.