मुंबई शहरातील सर्व धर्माच्या अनाधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्त आणि दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची समिती गठीत करण्याची घोषणा प्रभारी नगरविकासमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
भाजपचे योगेश सागर यांनी मुंबईतील अनाधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. उपगनरात अनेक ठिकाणी शासकीय जमीनीवर अतिक्रमणे झाली असून विविध ठिकाणी अनाधिकृतपणे धार्मिक स्थळे उभारण्यात आल्याचा आरोप सागर यांनी केला. घाटकोपर-मानखुर्द लिंग रोडवर म्हाडाच्या जागेवर अनाधिकृत मस्जिद बांधण्यात आली असून मालवणी मालाड येथे अनाधिकृत धार्मिक स्थळ, पठाणवाडीत तुंबा उपहारगृहाचे अनाधिकृत बांधकाम, धारावीतही काही अनाधिकृत धार्मिक स्थळे उभारण्यात आली आहेत.
याबाबत सातत्याने पाठपुरावा करुनही अनाधिकृत बांधकामावर कारवाई होत नसल्याचा आरोप सागर यांनी केला. त्यावर शहरातील अनाधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्त, शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी यांची समिती गठीत करण्यात येईल. या समितीकडून दर तीन महि्न्याला कारवाईचा अहवाल मागवला जाईल असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तर बेकायदेशीर धार्मिक बांधकामांवर कारवाई करताना कोणत्याही विशिष्ट धर्माच्या विरोधात निवडक पद्धतीने पावले उचलू नयेत.
अनधिकृत धर्मस्थळांच्या कारवाईसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत स्थानिक लोकप्रतिनिधींना स्थान द्यावे, अशी मागणी रईस शेख यांनी केली. हा प्रश्न केवळ एका धर्मापुरता मर्यादित नाही. मुंबई उच्च न्यायालयाने आधीच बेकायदेशीर धार्मिक स्थळांची यादी प्राधान्यक्रमाने केली असून महापालिकेने आजवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे काही दशकांपूर्वीची स्थळेदेखील वादग्रस्त ठरत आहेत, असे शेख यांनी सांगितले.