मुंबई : साहित्य संस्थांमध्ये राजकीय क्षेत्रातील मंडळींची लुडबूड वाढल्याची टीका होत असतानाच ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’च्या (कोमसाप) कार्यकारणीने स्वत:हून मंत्री व आमदारांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शनिवारी ‘कोमसाप’ कार्यकारणीची ३२ वी बैठक कुडाळ येथे पार पडली. त्यामध्ये राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांना परिषदेवर स्थान देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

‘कोमसाप’च्या निवडणुका होत नसून सर्वसंमतीने निवडी होतात. विद्यमान अध्यक्षा नमिता कीर यांची अध्यक्षपदी आणि प्रदीप ढवळ यांची कार्याध्यक्षपदी मागच्या आठवड्यात झालेल्या बैठकीत फेरनिवड करण्यात आली. १४ कार्यकारणी सदस्य आणि पाच विश्वस्तही सर्वानुमते निवडले आहेत. त्यामध्ये मंत्री उदय सामंत, आमदार संजय केळकर आणि संस्थेचे संस्थापक -मार्गदर्शक मधु मंगेश कर्णीक यांचा मुलगा अनुप यांच्या निवडी लक्षवेधी ठरल्या आहेत. मधु मंगेश कर्णीक यांचे वय झाल्याने त्यांच्या मुलास परिषदेवर घेण्यात आल्याचे कार्यकारणीकडून सांगण्यात आले.

नमिता कीर यांचे पती रमेश कीर हे काँग्रेसचे प्रदेश सचिव असून ते रत्नागिरी जिल्ह्याचे अनेक वर्षे जिल्हाध्यक्ष होते. रमेश कीर यांनी दोन वर्षापूर्वी शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदही लढवली होती. मंत्री उदय सामंत सुद्धा रत्नागरीचे असून ते जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आहेत. परिषदेचे संस्थापक मधुमंगेश कर्णीक यांच्या सूचनेनुसार सर्व निवडी करण्यात आल्याचे संस्थेच्या कार्यकारणीने स्पष्ट केले.

मंत्री उदय सामंत हे मराठी भाषा मंत्री आहेत तर आमदार संजय केळकर हे नाट्यक्षेत्रातील सक्रीय कार्यकर्ते आहेत. या दोघांच्या अनुभवाचा व कार्याचा संस्थेला लाभ व्हावा यासाठी त्यांना विश्वस्तपदी घेतले आहे, असे नवे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

साहित्यबाह्या बाबींना वैतागून १९३१ मध्ये मधु मंगेश कर्णीक यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला तोडीस तोड म्हणून ‘कोमसाप’ची स्थापना केली. मात्र आज ‘कोमसाप’ सुद्धा इतर साहित्य परिषदांचा कित्ता गिरवू पाहात असल्याचा आरोप होत आहे. गिरगावच्या ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या मागच्या आठवड्यात पार पडलेल्या निवडणुकीत राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सक्रीयता दाखवल्यामुळे मोठा वाद उभा राहिला होता. फोर्टमधील ‘एशियाटीक सोसायटी’ ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करत असल्याबाबत मुंबईच्या साहित्यिक वर्तुळातून नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘कोमसाप’ने मंत्री आणि आमदारांना संस्थेवर घेतल्याने चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.