मुंबई: मुलुंड येथे वास्तव्यास असलेल्या एका १५ वर्षीय मुलीने भांडुप परिसरातील बहुमजली इमारतीच्या ३१ व्या मजल्यावरून मंगळवारी सायंकाळी उडी मारून आत्महत्या केली. अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने तिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती असून याबाबत भांडुप पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अस्मि चव्हाण (१५) असे या मुलीचे नाव असून ती मुलुंड येथे कुटुंबियासह राहत होती. भांडुपमधील एल.बी.एस. रोडवरील महेंद्र स्प्लेदंर या इमारतीमध्ये राहणाऱ्या आदित्य नावाच्या मित्राला भेटण्यासाठी ती मंगळवारी सायंकाळी गेली होती. अभ्यासाच्या तणावामुळे तिला नैराश्य आले होते. मित्राने तिची समजूत घातल्यानंतर दोघेही खाली उतरत असताना अचानक तिने ३१ व्या मजक्यावरून खाली उडी मारली. स्थानिक रहिवाशांनी तत्काळ तिला पालिकेच्या अगरवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी अपमृत्युची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आदित्यची चौकशी केली. अस्मिवर अभ्यासामुळे ताण आला होता, असे त्याने चौकशीत पोलिसांना सांगितले.