मुंबई : बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीच्या निकालानंतर आता आरोप प्रत्यारोपांना फैरी झडू लागल्या आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक ताकदीने उतरलेल्या आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनेलला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे लाड यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. कामगारांनीच ठाकरे ब्रॅंडला चोख उत्तर दिल्याची तिखट प्रतिक्रिया लाड यांनी दिली. तर कोणी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये, असा सल्ला मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीच्या निकालांचे राजकीय वर्तुळात चांगलेच पडसाद उमटले आहेत. शिवसेना (ठाकरे) प्रणित बेस्ट कामगार सेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेने एकत्र येत या निवडणुकीत पॅनेल उतरवले होते. त्यामुळे या निवडणुकीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. त्यांना आव्हान देण्यासाठी आमदार प्रसाद लाड यांनीही एक पॅनल उभे केले होते. गेली नऊ वर्षे बेस्टच्या पतपेढीवर सत्ता असलेल्या बेस्ट कामगार सेनेला एकही जागा जिंकता न आल्यामुळे ठाकरे बंधूंच्या ब्रॅंड चालला नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीत ठाकरे ब्रँडला एकही जागा मिळाली नाही, हेच कामगार बांधवांनी दिलेले निर्णायक उत्तर असल्याची टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.

फेरमतमोजणीची मागणी

या निवडणुकीत प्रसाद लाड सर्व ताकदीनिशी उतरले होते. मात्र त्यांना सात जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे लाड यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. ते म्हणाले की, माझी कामगार क्षेत्रातील ही पहिली स्वतंत्र निवडणूक असून, पक्षीय पाठिंबा न घेता आम्ही ७ जागा जिंकल्या. काही जागा क्षुल्लक फरकाने गेल्या, तर ८ जागा ३० ते ४० मतांच्या फरकाने हातातून निसटल्या. जवळपास २१५० मतपत्रिका अवैध ठरल्या असून, कमी फरकाने गेलेल्या जागांसाठी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. पक्षाचा पाठिंबा घेतला असता तर आम्ही सर्व जागा जिंकल्या असतो, याची मला खात्री आहे.

ठाकरेंच्या पॅनेलला अवैध मतांपेक्षाही कमी मते

या मतमोजणीत कामगारांनी पहिल्या क्रमांकावर शशांक राव यांना मतदान केले, त्याखालोखाल प्रसाद लाड यांच्या श्रमिक उत्कर्ष सभा प्रणित सहकार समृद्धी पॅनेल, तर चौथ्या क्रमांकावर ठाकरेंच्या पॅनेलला मतदान झाले आहे. अवैध मतांचा आकडा हा ठाकरेंच्या पॅनेलला मिळालेल्या मतांपेक्षा अधिक असल्याचा खोचक आरोप लाड यांनी केला आहे. या निवडणुकीत विद्यमान भ्रष्टाचारी संचालकांची टोळी हद्दपार करणे हाच आमचा मुळ उद्देश होता आणि तो आम्ही साध्य केला, असेही ते म्हणाले.

शशांक राव यांचाही ठाकरेंना टोला

कामगारांच्या हिताचे काम केले नाही, तर त्यांना कामगार नाकारतात, असा टोला या निवडणुकीत भरघोस यश मिळालेले शशांक राव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हाणला. कोणी, कितीही जण एकत्र आले तरी त्यांनी जर कामगारांचे हित बघितले नाही, तर त्यांच्या वाट्याला असे भोपळेच येत राहणार असाही टोला राव यांनी ठाकरे यांना लगावला.