मुंबई : मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) कफ परेड – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरील प्रवाशांसाठी आता मासिक ट्रिप पास सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यादृष्टीने काम सुरू असून येत्या १० दिवसांत मासिक ट्रिप पास सुविधा कार्यान्वित करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. एमएमआरसीच्या ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रोतील आरे – बीकेसी टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. बीकेसी – आचार्य अत्रे चौक असा टप्पा सुरू झाला आणि आरे – आचार्य अत्रे चौक दरम्यान मेट्रो धावू लागल्यानंतर प्रवाशी संख्येत काहीशी वाढ झाली.
मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. पण आता मात्र आचार्य अत्रे चौक – कफ परेड टप्पा सुरू झाला. त्यानंतर आरे – कफ परेड मेट्रो ३ मार्गिकेवर पूर्ण क्षमतेने मेट्रो धावू लागल्यानंतर या मार्गिकेवरील प्रवासी संख्येत वाढ होऊ लागली. या मार्गिकेला प्रतिसाद मिळत असताना प्रवाशांनाकडून विविध सुविधांची मागणीही होत आहे. मासिक पास सुविधा सुरू करण्याची मागणी मुंबईकरांकडून करण्यात येत होती. ही मागणी मान्य करून आता एमएमआरसीने मासिक ट्रिप पास सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एमएमआरसीतील अधिकाऱ्यांनी दिली.
मासिक ट्रिप पास सुविधा सुरू करण्याच्यादृष्टीने तिकिट प्रणालीतील आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरू आहे. बदल करून येत्या १० दिवसांत ही सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे. किती फेऱ्यांसाठी किती रक्कम आकारली जाणार हे १० दिवसांनंतरच समजेल. मात्र मासिक पास प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे. मेट्रो १ (घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा), मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली) मार्गिकेवर मासिक ट्रिप पासची सुविधा आहे.