मुंबई : अंधेरी पश्चिम आणि पूनम नगरला (जेव्हीएलआर) जोडणाऱ्या ५.०८ किमी लांबीच्या अंधेरी – जेव्हीएलआर उड्डाणपुलाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतले आहे. या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला असून इन्फिनिटी माॅल जंक्शनवर ५५८ मेट्रीक टन वजनाचा आणि ५२ मीटर लांबीचा विशेष स्पॅन यशस्वीपणे स्थापित करण्यात आला. हा टप्पा पूर्ण झाल्याने आता कामाला आणखी वेग देत हा प्रकल्प मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. हा उड्डाणपूल वाहतूक सेवेत दाखल झाल्यास अंधेरी पश्चिम – जोगेश्वरी पश्चिम दरम्यानचा प्रवास अतिजलद होण्यास मदत होणार आहे.

अंधेरी – जोगेश्वरीदरम्यानच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून प्रवास अतिजलद करण्यासाठी मुंबई महापालिकेने अंधेरी पश्चिम (इन्फिनिटी माॅलजवळ) ते पूनन नगर, जोगेश्वरी पश्चिम दरम्यान ५.०८ किमी लांबीचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात केली. महापालिकेने ०.९३ किमीचे काम पूर्ण केले, मात्र त्यानंतर हा प्रकल्प एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आला. एमएमआरडीएच्या स्वामी समर्थ नगर – जोगेश्वरी मेट्रो ६ मार्गिका आणि महापालिकेचा उड्डाणपूल समांतर जात असल्याने पालिकेने उड्डाणपूलाचे काम एमएमआरडीएकडे सोपवले. एमएमआरडीएने उर्वरित काम दोन टप्प्यांत हाती घेतले. यात २.५८ किमीचा दुमजली पूल आणि १.५६ किमीचा मिसिंग लिंक मार्ग आहे. दुमजली पुलाचे ८० टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मिसिंग लिंकचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.

अंदाजे ७६८.८५ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील अर्थात मिसिंग लिंकमधील एक महत्त्वाचा टप्पा एमएमआरडीएने पूर्ण केला आहे. इन्फिनिटी माॅल येथे ५५८ मेट्रिक टन वजनाचा, ५२ मीटर लांबीचा विशेष स्पॅन यशस्वीरित्या स्थापित करण्यात आला. ४६.५ मेट्रिक टन वजनाच्या १२ स्टील काॅम्पोझिट गर्डर्स वापरून हा विशेष स्पॅन तयार करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यातील विशेष स्पॅन स्थापित करण्याचे अत्यंत कठीण आणि महत्त्वाचे काम पूर्ण झाले असून आता दुसर्या टप्प्यातील पुढील कामाला वेग येईल, अशी माहिती एमएमआरडीएने दिली. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील दुमजली पुलाचे काम जून २०२६ पर्यंत, तर दुसऱ्या टप्प्यातील मिसिंग लिंकचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होईल, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले.