स्थानकाबाहेरील बहुविध सेवांच्या व्यवस्थापनासाठी निविदा

मुंबई : या वर्षअखेर कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असणाऱ्या पश्चिम उपनगरातील दोन मेट्रो मार्गिकांवर स्थानकानजीकच्या मॉल, व्यावसायिक संकुल अशा विकासकामांना थेट जोडणी देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने प्रयत्न सुरू केले असून, त्या अनुषंगाने खासगी विकासकांची कार्यशाळा मंगळवारी घेण्यात आली आहे. तसेच स्थानकाजवळील बहुविध सेवांच्या एकत्रीकरणासाठी सल्लागार आणि व्यवस्थापनाबाबतच्या निविदादेखील जारी केली आहे.

मेट्रो मार्ग ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) आणि मेट्रो मार्ग २ ए (डीएन नगर ते दहिसर) या दोन मार्गिका या वर्षअखेर पूर्ण होणार आहेत. मेट्रो स्थानकानजिकच्या विकासकामांना स्थानकातून थेट जोडणी देण्यासंबंधीच्या धोरणास एमएमआरडीएने मागील महिन्यात मंजुरी दिली होती. त्यासंदर्भातील नियम व इतर तपशील ठरविण्यात आले होते. त्यानुसार या जोडणीचा पूर्ण खर्च हा जोडणी घेणाऱ्या विकासकास करावा लागेल, त्याचे बांधकाम प्राधिकरणामार्फत केले जाईल. एमएमआरडीएने मंगळवारी या संदर्भात खासगी विकासकांसोबत कार्यशाळा घेऊन नवीन कल्पना, सूचना, रेखांकन, बांधकाम आणि अटी व शर्ती याबाबत चर्चा केली.

या संदर्भात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त म्हणाले, ‘मॉल आणि व्यावसायिक संकुलांमध्ये थेट प्रवेश करणे लोकांसाठी तसेच विकासकांसाठीही फायदेशीर ठरेल. दोन्हीकडून ही सुविधा उपयोगी ठरणार असून, प्रवाशांना त्यासाठी रस्त्यावर प्रवेश करावा लागणार नाही आणि या सुविधेमुळे रस्त्यावरील कोंडी कमी होईल.’

त्याचबरोबर मेट्रो स्थानकांवरील प्रवेशासाठी आणि स्थानकानजीकच्या बहुविध सुविधांच्या व्यवस्थापनासाठी प्राधिकरणाने आत्तापासूनच पावले उचलली असून त्यासंदर्भात नुकत्याच निविदा काढल्या आहे. वर्षअखेर कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असणाऱ्या दोन्ही मार्गावरील एकूण ३० स्थानकांसाठी ३५६.८५ कोटी रुपयांच्या निविदा जारी केल्या आहेत.

मेट्रो स्थानकांबाहेरील सार्वजनिक वाहतूक, टॅक्सी, रिक्षा अशी खासगी वाहतूक आणि अन्य पर्यायांबाबतचे व्यवस्थापन आणि सल्लागार या निविदांमार्फत नेमण्यात येतील असे एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी सांगितले.

या दोन्ही मेट्रो मार्गिका दाट शहरी वस्तीतून जात असल्यामुळे मेट्रो स्थानकांना थेट जोडणी तसेच लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी अन्य पर्यायांचे नियोजन सध्या केले जात आहे. भविष्यात मुंबई आणि महानगर परिसरात १४ मार्गिकांच्याद्वारे एकूण ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे विणले जाणार असून, त्यामध्ये २२५ स्थानकांचा समावेश असेल. भविष्यात इतर मार्गिका कार्यान्वित होण्यापूर्वी तेथेदेखील अशा कार्यशाळेचे आयोजन केले जाईल.