मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) पॉडटॅक्सी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. आता कुर्ला स्थानकावरुन थेट कुर्ल्यातील पॉडटॅक्सी स्टॅण्डपर्यंत पोहचणे प्रवाशांना सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीएने कुर्ला स्थानक ते पॉडटॅक्सी स्टॅण्ड असा स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुर्ला स्थानक ते बीकेसी आणि बीकेसी ते वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक प्रवास सुकर आणि अतिजलद होण्यास मदत मिळणार आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव लवकरच प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला जाण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या बीकेसीत सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. बीकेसीत येणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी एमएमआरडीएकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कुर्ला स्थानक ते वांद्रे पूर्व स्थानक असा ८.८ किमीचा पॉडटॅक्सी मार्ग बांधला जाणार आहे.

या प्रकल्पासाठी १०१६.३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून सार्वजनिक-खासगी तत्त्वावर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. या प्रकल्पाचे कंत्राट मेसर्स साई ग्रीन मोबिलिटी प्रा. लिमिटेड आणि मेसर्स अल्ट्रा पीआरटी या कंपनीला देण्यात आले आहे. कंत्राटानुसार मार्गाची उभारणी आणि पॉडटॅक्सीचे संचलन या कंपनीकडून केले जाणार आहे.

३० वर्षाच्या कालावधीसाठी कंपनीकडून पॉडटॅक्सीचे संचलन केले जाणार आहे. प्रवाशांना पॉडटॅक्सीसाठी प्रति किमी २१ रुपये याप्रमाणे दर मोजावे लागणार आहेत. या प्रकल्पासाठी एमएमआरडीए आणि कंपनीत करार झाला आहे. आता कुर्ला रेल्वे स्थानक ते पॉडटॅक्सी स्टॅण्डदरम्यान स्कायवाॅक बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.

एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार कुर्ला रेल्वे स्थानक ते कुर्ल्यातील पॉडटॅक्सी स्टॅण्डदरम्यान स्कायवॉक बांधण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु असून स्कायवॉकसाठी रेल्वेकडून एमएमआरडीएला जागा दिली जाणार आहे. त्यानुसार अंदाजे १३७० चौ.मीटर इतकी जागा रेल्वेकडून स्कायवॉकसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

कुर्ला स्थानक ते पॉडटॅक्सी स्टॅण्ड अंतर अंदाजे २०० मीटरचे आहे. त्यामुळे यादरम्यान हा स्कायवॉक असेल. त्यामुळे पॉडटॅक्सी स्टॅण्डपर्यंत पोहचणे प्रवाशांना सोपे होणार आहे. स्कायवॉक किती किमीचा असेल, कसा असेल, त्यासाठी किती खर्च येईल यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव एमएमआरडीएकडून तयार करण्यात येत आहे. हा प्रस्ताव पूर्ण होऊन त्यास प्राधिकरणाची मान्यता घेतली जाणार आहे.