मंगल हनवते, लोकसत्ता

मुंबई : बृहन्मुंबई क्षेत्रातील पश्चिम उपनगरामधील मढ, मालवणी, मार्वे, एरंगल, दारवली आणि आकसे या गावांचा वांद्रे-कुर्ला संकुलाच्या (बीकेसी) धर्तीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून विकास केला जाणार आहे. या गावांतील १३८६.८५ हेक्टर जागेचा विशेष विकास क्षेत्र म्हणून विकास करण्यात येणार आहे. या जागेत परवडणारी घरे, मैदाने, अ‍ॅम्युझमेन्ट पार्क, बायोटेक पार्क, चित्रनगरी वसवली जाणार आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २०११.११ हेक्टर जागा विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नमूद आहे. यातील २३५.७१ हेक्टर जागा राज्य सरकारच्या मालकीची आहे. यापैकी ९३६.६२ हेक्टर एकसंघ जागा मढ, मालवणी, मार्वे, एरंगल, दारवली आणि आकसे या सहा गावांमध्ये आहे, तर उर्वरित ४५०.२३ हेक्टर जागा आहे. अशा एकूण १३८६.८५ हेक्टर जागेचा विकास विशेष विकास क्षेत्र म्हणून करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर हा विकास करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. यासाठी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यासाठीचा विनंती प्रस्ताव एमएमआरडीएने प्राधिकरणासमोर ठेवला होता. आता या प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरीची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा >>> तस्करी रोखण्यात पोलिसांची भूमिका काय? आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशी संवादसंधी

विकास कसा करणार?

* हा प्रस्ताव मंजूर झाल्यास १३८६. ८५ हेक्टर जागेत परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. तसेच मोकळय़ा जागा, सामाजिक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

* चित्रनगरी, आयटी पार्क, बायोटेक युनिट, अ‍ॅम्युझमेन्ट पार्क, पर्यटन विकास केला जाणार आहे. यासाठीचा राज्य सरकारकडे विनंती प्रस्ताव सादर करण्यात आला आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर या विशेष विकास क्षेत्राचा आराखडा तयार करणे, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली तयार करणे, या क्षेत्रातील शासकीय जमिनीची विल्हेवाटीबाबतचे धोरण तयार करणे, अशी कार्यवाही करण्यात येणार आहे. * या सर्व कार्यवाहीसाठी महानगर आयुक्तांना प्राधिकृत करण्यात येणार आहे.