मुंबई : वडाळा-ठाणे-कासारवडवली-गायमूख मेट्रो ४ आणि ४ अ मार्गिकेतील गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा १०.५ किमीचा टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) जाहिर करण्यात आले होते. मात्र सोमवारी एमएमआरडीएकडून गायमुख ते विजय गार्डन अशा ४.४ किमीदरम्यानच मेट्रो गाड्यांसह विविध यंत्रणांच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात आली. त्याचवेळी डिसेंबर २०२५ अखेरीस गायमुख ते विजय गार्डन अशी मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होईल, असे जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत डिसेंबरअखेरपर्यंत कॅडबरी जंक्शन ते गायमूख असा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाण्याची एमएमआरडीएची घोषणा फसवी ठरल्याची चर्चा आहे. गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा मेट्रो प्रवास करण्यासाठी आता ठाणेकरांनी एप्रिल २०२६ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

एमएमआरडीएने ३२.३२ किमी लांबीच्या मेट्रो ४ आणि २.७ किमीच्या ४ अ मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. या मार्गिकेचे काम टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा १०.५ किमीचा पहिला टप्पा निश्चित करून हा टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएने निश्चित केले. त्यानुसार कामाला वेग दिला तर या १०.५ किमीच्या मार्गिकेवरील चाचण्यांना आॅगस्टमध्ये सुरुवात केली जाईल, असेही जाहिर केले.

मात्र काही कारणांने चाचण्यांस विलंब झाला. पण अखेर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चाचण्यांना सुरुवात झाली. मात्र यावेळी गायमुख ते कॅडबरी जंक्शन अशा १०.५ किमी मार्गिकेवरील नाही तर गायमुख ते विजय गार्डन अशा ४.४ किमीच्या मार्गिकेवरील चाचण्यांच सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले. हा ४.४ किमीचाच टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल केला जाणार असल्याचेही जाहिर करण्यात आले. त्यामुळे डिसेंबरअखेरीस गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा मेट्रो प्रवास करण्याच्या ठाणेकरांच्या स्वप्नावर आता पाणी पडले आहे.

एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२५ मध्ये गायमुख ते विजय गार्डन अशी ४.४ किमीची आणि चार स्थानकांचा समावेश असलेली मार्गिका वाहतूक सेवेत दाखल केली जाणार आहे. या पहिल्या टप्प्यातील विजय गार्डन ते कॅडबरी जंक्शन असा ६.६ किमीचा आणि सहा स्थानकांचा समावेश असलेला टप्पा एप्रिल २०२६ मध्ये खुला केला जाणार आहे. त्यामुळे गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा मेट्रो प्रवास करण्यासाठी ठाणेकरांना आता थेट एप्रिल २०२६ पर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

संपूर्ण मार्गिकेचे संचलन सुरु करून गायमुख ते वडाळा मेट्रो प्रवासासाठी मुंबईकर, ठाणेकरांना आॅक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. डिसेंबरमध्ये केवळ गायमुख ते विजय गार्डन इतकाच टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार असल्याबद्दल एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे विचारणा केली असता त्यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षात, अर्थात ३१ मार्च २०२६ पर्यंत गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा संपूर्ण पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होईल असे सांगितले. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहापैकी चार मेट्रो स्थानकांचीच कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकणार असल्याने डिसेंबरपर्यंत ४.४ किमीची मार्गिका सुरु केली जाणार आहे. उर्वरित सहा मेट्रो स्थानकांच्या कामास विलंब होणार असून ही कामे मार्च २०२६ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे उर्वरित ६.६ किमीचा टप्पा एप्रिल २०२६ मध्ये वाहतूक सेवेत दाखल केला जाणार आहे.