दिवाळी सणाच्या निमित्ताने भाऊबीजेच्या शुभमुहुर्तावर राज ठाकरे यांनी आज नव्या घरात प्रवेश केला. त्यांचं आधीचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज शेजारीच हे नवं पाच मजली घर असणार आहे. ‘शिवतीर्थ’ असं त्यांच्या नव्या घराचं नाव आहे. त्यामुळे आता शिवतीर्थवरून ‘नवनिर्माण’ होणार आहे.
कृष्णकुंज हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आधीचं निवासस्थान. त्यांनी कृष्णकुंज या आपल्या घराच्या बाजूलाच आणखी एक नवं घर बांधलं आहे. राज ठाकरे आज म्हणजेच ६ नोव्हेंबर रोजी आपल्या पाच मजली घरात राहायला जाणार आहेत. हे घर सर्व सोयीसुविधांनी युक्त आहे. भाऊबीजेच्या मुहूर्तावर ते आपल्या नव्या घरात कुटुंबासोबत राहायला जातील. या घराचं पूजन आज राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.
आज सकाळी साडे दहा वाजता राजपुत्र अमित ठाकरे यांच्या हस्ते नव्या घराची पूजा झाली. तसंच शिवतीर्थ या घराच्या पाटीचं अनावरणही अमित ठाकरे यांच्या हस्ते झालं. यानंतर राज ठाकरे यांनी नव्या घराची पाहणी केली. दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरुन त्यांनी बंगल्याखाली जमलेल्या मनसैनिकांना अभिवादन केलं.
कसं असेल राज ठाकरे यांचं नवं घर?
‘कृष्णकुंज’शेजारी बांधण्यात आलेल्या या पाच मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. याच इमारतीतमध्ये आता मनसेचे मुख्य कार्यालय देखील असणार आहे. याच ठिकाणी राज ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत, तसेच इतर नागरिकांना देखील याच कार्यालयात राज ठाकरे यांची भेट घेता येणार आहे, अशी माहिती मिळत आहे. इतर मजल्यावर ठाकरे यांच्या कुटुंबीयांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या इमारतीमध्ये सुसज्ज सर्व सोयी सुविधांनी युक्त असे एक भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आले आहे.