दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सुरू असलेल्या दसरा मेळाव्याने यंदा गर्दीचा विक्रम मोडीत काढला आहे. यंदा समाजमाध्यमांवर दीपोत्सवातील रोषणाईपेक्षा गर्दीच्याच ध्वनिचित्रफिती अधिक दिसत होत्या. शिवाजी पार्कवर होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यापेक्षाही या दीपोत्सवाला अधिक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. यंदा मात्र हा दीपोत्सव लवकर संपणार असून आज रविवारी या दीपोत्सवाचा शेवटचा दिवस आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या शिवाजी महाराज पार्कमध्ये १७ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत दिपोत्सवाचे आयोजन केले आहे. मनसेच्या दीपोत्सवाचे हे १३ वे वर्ष आहे. १७ऑक्टोबर रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. यंदा या उत्सवाला प्रथमच उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे यावेळच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. तरुणतरुणींमध्ये या दिपोत्सवाचे प्रचंड आकर्षण असून या ठिकाणी छायाचित्र काढण्यासाठी मुंबईकरांची गर्दी होत असते. यंदा ही गर्दी खूपच जास्त होती. उपनगरातून तसेच मुंबईच्या आसपासच्या शहरांमधूनही लोक वाहने घेऊन शिवाजी पार्कचा दिपोत्सव बघण्यासाठी हजर होती.शिवाजी पार्क वर शिवसेनेचा दसरा मेळावा, मनसेचा गुढी पाडवा मेळावा, किंवा निवडणूकीच्या काळात सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचार सभा होतात. त्यावेळी जमणाऱ्या गर्दीपेक्षा अधिक गर्दी या दीपोत्सवाला होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे
दरवर्षी तुलसी विवाहापर्यंत सुरू राहणारा दिपोत्सव यंदा दहा दिवसातच संपणार आहे. रविवारी २६ ऑक्टोबर रोजी हा दीपोत्सव संपणार आहे. दीपोत्सवाच्या माळा, झुंबर, कंदील हे तुलसी विवाहापर्यंत नीट राहत नाहीत, तसेच दिवाळी संपल्यावर लोकांचे दैनंदिन व्यवहार सुरू झाल्यावर दीपोत्सव पाहायला येणाऱ्यांची संख्या रोडावत जाते. त्यामुळे यंदा लवकर दीपोत्सव आटोपता घेण्यात येत असल्याची माहिती मनसेचे उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली.
तीन मिनीटांच्या आतषबाजीसाठी मैदानात गर्दी
या दिपोत्सवादरम्यान दरदिवशी संध्याकाळी साडे सात वाजता आकाशात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. अवघ्या दोन तीन मिनीटांची ही आतषबाजी बघण्यासाठी बघ्यांची व उत्साही प्रेमींची खूप गर्दी मैदानात रोज जमते. सात वाजल्यापासूनच मैदानात गर्दी जमायला सुरूवात होते. तब्बल ९८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले हे मैदान गर्दीने फुललेले असते. आतषबाजी झाल्यानंतर मैदानातून बाहेर पडणाऱ्या गर्दीच्या ध्वनिचित्रफिती यंदा मोठ्या प्रमाणावर बघायला मिळाल्या. या गर्दीत रिल्स बनवणाऱ्या तरुण तरुणींची संख्या मोठी असते. त्यामुळे दिव्यांच्या रोषणाईत, सेल्फी पॉईंटवर छायाचित्रे काढून घेण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण तरुणी, तसेच कुटुंबासह येणारी उत्साही मंडळी दिसत होती.
