शिवसेना-भाजप महायुतीची जय्यत तयारी आणि महाराष्ट्रातील उमेदवार घोषित करण्याची आपची आघाडी या पाश्र्वभूमीवर मनसेमधील नेत्यांची चर्चा मात्र महाराष्ट्रात नेमक्या किती जागा लढवाव्या या पेचामध्येच गुरफटली आहे. त्याचप्रमाणे मुंबई व नाशिकमधील आमदार लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णभुवन या निवासस्थानी लोकसभा निवडणुकीनिमित्त झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत उमेदवारीचा गुंता सोडवायचा कसा आणि किती जागा लढविणे शक्य आहे यावर खलबते रंगली. आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, राजन शिरोडकर, केदार होंबाळकर आणि शिरीष सावंत या निवडक लोकांच्या झालेल्या बैठकीत उमेदवारांच्या नावावरून बराच खल झाला. दक्षिण मध्य मुंबईमधून मनविसेचा अध्यक्ष आदित्य शिरोडकर, दक्षिण मुंबईमधून बाळा नांदगावकर, उत्तर मुंबईमधून शालिनी ठाकरे, कल्याणमध्ये मनसे आमदार रमेश पाटील, पुण्यामधून दिपक पायगुडे आणि नाशिकमध्ये डॉ. पवार यांच्या नावाचा विचार करण्यात आला. ईशान्य मुंबईतून मनसेचे तीन आमदार विजयी झाले असतानाही लोकसभा लढविण्यासाठी यापैकी कोणी इच्छुक नसल्याचे मनसेच्या एका नेत्याने सांगितले. नाशिकमध्येही मनसेचे तीन आमदार असून त्यापैकी एकही आमदार लोकसभा लढविण्यास तयार नसून नाशिक लोकसभा मतदारसंघातमनसेतर्फे डॉ. सतीश पवार यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे तसेच जळगाव, परभणी, उस्मानाबाद, हिंगोल, औरंगाबाद येथील जागा लढविण्याचे निश्चित करण्यात आले असून विदर्भात अमरावतीसह कोणत्या जागा लढविता येतील यावर चर्चा करण्यात आली. साधारणपणे महाराष्ट्रात सोळा ते अठरा जागा मनसे लढवेल असे मनसेच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या वेळी उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढविणारे मनसेचे सरचिटणीस शिरिष पारकर हे पुन्हा लढण्यास इच्छुक नाहीत तर शालिनी ठाकरे या पक्ष सांगेल तेथून निवडणूक लढविण्यास तयार आहेत. दक्षिण मुंबईमधून मनसेच्या तिकीटावर लढण्याची माजी शिवसेना खासदार मोहन रावले यांची तयारी असली तरी त्यांना उमेदवारी देण्याबाबत अद्यापि राज यांनी हिरवा कंदिल दाखविलेला नाही.
साधारणपणे महाराष्ट्रात सोळा ते अठरा जागा मनसे लढवेल. ईशान्य मुंबईतून मनसेचे तीन आमदार विजयी झाले असतानाही लोकसभा लढविण्यासाठी यापैकी कोणी इच्छुक नसल्याचे मनसेच्या एका नेत्याने सांगितले. नाशिकमध्येही एकही आमदार लोकसभा लढविण्यास तयार नाही.
संग्रहित लेख, दिनांक 21st Feb 2014 रोजी प्रकाशित
लोकसभा नको रे बाबा..
शिवसेना-भाजप महायुतीची जय्यत तयारी आणि महाराष्ट्रातील उमेदवार घोषित करण्याची आपची आघाडी या पाश्र्वभूमीवर मनसेमधील नेत्यांची चर्चा मात्र महाराष्ट्रात नेमक्या किती जागा लढवाव्या या पेचामध्येच गुरफटली आहे.
First published on: 21-02-2014 at 04:30 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns legislature avoiding to contest loksabha elections