MNS Slams BJP after BEST Credit Society Election Society Results : बृहन्मुंबई महानगरपालिकेची लिटमस टेस्ट म्हणून ज्या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं त्या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी (२० ऑगस्ट) जाहीर झाला. भाजपा विरुद्ध ठाकरे बंधुंमधील या लढाईत अनपेक्षित निकाल आला असून कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलचे १४ उमेदवार निवडून आले आहेत. तर, भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलचे सात उमेदवार निवडून आले आहेत. ठाकरे बंधुंच्या पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे बेस्टच्या पतपेढीवर राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनची सत्ता आली आहे. दुसऱ्या बाजूला, मुंबईतील पोर्ट ट्र्स्टच्या निवडणुकीत मात्र ठाकरेंचा वरचष्मा पाहायला मिळाला. या निवडणुकी १५ पैकी ११ जागा ठाकरेंना मिळाल्या आहेत.
दरम्यान, बेस्ट पतपेढीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपासह शिवसेनेने (शिंदे) एकच जल्लोष केला. भाजपाने मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी करत ठाकरे बंधुंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी ‘ठाकरे ब्रँड कोमात, देवाभाऊ जोमात’ असे होर्डिंग्स अनेक ठिकाणी लावले आहेत. भाजपा नेते आशिष शेलार, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनी विजयाचं सेलिब्रेशन केलं असलं तरी बेस्टच्या पतपेढीत त्यांचं पॅनेल जिंकलेलं नाही. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपाला चिमटा काढला आहे.
मनसेचा भाजपाला चिमटा
मनसेने समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “मुंबईकरांनी भाजपला नाकारले! मुंबईत बॅलेट पेपरवर काल दोन निवडणुका झाल्या. पोर्ट ट्रस्टमधे १५ पैकी ११ जागा ठाकरेंना मिळाल्या. तर बेस्ट पतपेढीच्या २१ पैकी १४ जागा इतरांना मिळाल्या. भारतीय जनता पक्षाचा बॅलेट पेपरवर दोन्ही ठिकाणी पराभव झाला आहे. मग भाजपाला आसुरी आनंद कशाचा झाला आहे?”
शशांक राव यांची कामगार संघटना भाजपाशी संलग्न नाही
बेस्टच्या निवडणुकीत शशांक राव यांचं पॅनेल जिंकलं आहे. राव हे भाजपाचे पदाधिकारी असले तरी या निवडणुकीत त्यांचं पॅनेल भाजपाशी संबंधित नव्हतं. “आमची संघटना कोणत्याही पक्षाशी संलग्न नाही”, असं स्वतः राव यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केलं आहे.
शशांक राव यांचा ठाकरे बंधुंना टोला
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतील विजयानंतर शशांक राव म्हणाले, “आम्ही फक्त कामगारांच्या हिताचं काम केलं. त्यामुळे मला वाटतं की कोणीही एकत्र आलं तरी त्यांनी जर कामगारांसाठी काम केलेलं नसेल, कामगारांचे हित बघितलं नसेल तर त्यांच्या वाटेला असेच भोपळे येणार.”