महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने(मनसे) मावळ आणि रायगड लोकसभा मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाला(शेकाप) पाठिंबा जाहीर केला आहे.
शेकापचे नेते जयंत पाटील यांनी आज(बुधवार) कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर मावळ आणि रायगड मतदार संघात शेकापला लोकसभा निवडणूकीसाठी मनसेचा पाठिंबा असल्याचे जाहीर करण्यात आले.
शिवसेनेबरोबरची युती तोडून शेकापने स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. मावळ आणि रायगड या दोन्ही जागांवर शेकाप स्वबळावर लढत आहे. शेकापकडून रायगडमधून रमेश कदम आणि मावळमधून लक्ष्मण जगताप लोकसभेसाठी नशीब आजमवणार आहेत. जयंत पाटील यांनी मावळ आणि रायगडमधून आपली ताकद राज ठाकरेंना पटवून दिली. त्यामुळे मनसेने शेकापला जाहीर केलेल्या पाठिंब्यामुळे या दोन्ही मतदार संघात शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे. शेकापच्या स्वतंत्र उमेदवारांमुळे शिवसेना उमेदवारांच्या मतांवर परिणाम होणार आहे.