लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील पवई येथे राहणाऱ्या गायक संतोष कपारे यांनी सलग १६ तासांत १५३ गाणी गाण्याचा नवीन जागतिक विक्रम ९ फेब्रुवारी रोजी नोंदवला आहे. ‘इंटरनॅशनल एक्सेलन्स ॲवॉर्ड’कडून या विक्रमाची नोंद घेण्यात आली आहे.
चेंबूर येथील ‘अंतरा म्युझिक ॲण्ड एन्टरटेन्मेट’ तर्फे सिवास्वामी फाइन आर्ट ऑडिटोरियम येथे ‘सदाबहार मोहम्मद रफी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संतोष कपारे यांनी सलग १६ तास मोहम्मद रफी यांची १५३ गाणी गाण्याचा जागतिक विक्रम केला. यावेळी कपारे यांना मानिषा निश्चल, रूची चुडिवाले, कोमल धांडे पाठारे व सीमा चक्रवर्थी यांनी गाण्यात साथ दिली.
आणखी वाचा- बायोगॅसच्या प्रकाशाने मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये उजळणार
कपारे यांना रचलेल्या या जागतिक विक्रमासाठी इंटरनॅशनल एक्सेलन्स ॲवॉर्डचे संस्थापक संदीप सिंह यांनी कपारे यांना मानपत्र देऊन सन्मानित केले. कपारे यांनी २०२२ साली ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे १३ तासांत मोहम्मद रफी यांची १२४ गाणी गाऊन ‘भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड’मध्ये आपले नाव नोंदवले होते.