भाजपा नेते मोहित कंबोज यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत सूचक ट्वीट करत निशाणा साधला आहे. कंबोज यांनी आधी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशीची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक नेता तुरुंगात जाणार असल्याचं विधान केलं होतं. त्यावर रोहित पवारांनी कंबोज यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. आता कंबोज यांनी थेट रोहित पवार यांनाच लक्ष्य केलं आहे.

मोहित कंबोज आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “मी सध्या बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीचा अभ्यास करत आहे. यात मी त्यांच्या कंपनीच्या यशाचाही अभ्यास करत आहे. लवकरच मी या संदर्भात माहिती देईल. त्यामुळे तुम्हाला या कंपनीच्या यशामागील गोष्ट समजून घ्यायला मदत होईल.”

मोहित कंबोज यांनी अजित पवारांनंतर आता पवार कुटुंबातील आणखी एका सदस्यावर निशाणा साधला आहे. आधी सिंचन घोटाळा आणि आता रोहित पवार यांच्या ॲग्रो आणि सहकारी कारखान्यांचा उल्लेख केल्याने कंबोज यांचे ट्वीट चर्चेत आहे.

दरम्यान, याआधी मोहीत कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचं भाकीत करणारं ट्वीट केलं होतं. त्यांचा बोलण्याचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होता. मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी केली जावी, अशी मागणी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यावर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देत मोहीत कंबोज यांच्यावर टीका केली होती.

हेही वाचा : सत्तेची मस्ती डोक्यात गेली का? अजित पवारांचा शिंदे सरकारला खडा सवाल! संतोष बांगर यांनाही सुनावलं

कंबोज यांनी अजित पवारांवर टीका केल्यानंतर रोहित पवारांनी मोहीत कंबोजांवर टीकास्र सोडलं होतं. तसेच मोहित कंबोज यांनी सामान्य नागरिकांचा पैसा असलेल्या दोन-तीन बँकांना चुना लावल्याचा आरोप केला होता. तसेच कंबोजांच्या ट्वीटला किती महत्त्व दिलं पाहिजे? हे आपण समजून घेतलं पाहिजे,” असं म्हणत टोला लगावला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहित कंबोज नेमकं काय म्हणाले होते?

मोहित कंबोज यांनी अलीकडेच काही खळबळजनक ट्वीट्स केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेते लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. आणखी एक ट्वीट करत कंबोज यांनी सिंचन घोटळ्याची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली होती. संबंधित ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, “२०१९ मध्ये परमबीर सिंह यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा.” या ट्वीटमध्ये कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं होतं.