भारतीय जनता पार्टीचे नेते मोहीत कंबोज यांनी मंगळवारी रात्री केलेल्या तीन ट्वीटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच त्यांनी बुधवारी रात्री अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची भेट घेणार आहे, अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं होतं. अन्य एक ट्वीट करत त्यांनी सिंचन घोटळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणीही केली होती. त्यांनी कुणाचही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होता हे स्पष्टच आहे. या घोटाळ्यावरुन चर्चा सुरु झाली असतानाच काल रात्री ते फडणवीसांची भेट घेण्यासाठी गेल्याने नेमकी ही भेट कशासाठी अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र या भेटीमागील कारणाचा खुलासा कंबोज यांनीच केला आहे.

नक्की वाचा >> ‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आले अन्…

मंगळवारपासून सुरु असणाऱ्या या घडामोडीनंतर कंबोज बुधवारी रात्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. एवढंच नव्हे तर फोन टॅपिंग प्रकरणातील आरोप असणाऱ्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्लादेखील फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल झाल्याचं प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांनी टीपलं. शुक्ला ह्या सध्या हैदराबाद याठिकाणी कार्यरत आहेत, असं असूनही त्या फडणवीसांची भेट घेण्यासाठी ‘सागर’ बंगल्यावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पण ही भेट झाल्यानंतर कंबोज यांनी भेटीचं नेमकं कारण काय होतं याबद्दलची माहिती दिली.

नक्की वाचा >> CM शिंदेंना पाहताच विरोधकांकडून ‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी; शिंदेंसमोर चालणारा आमदार वैतागून म्हणाला, “तुम्हाला…”

कंबोज हे सागर बंगल्याच्या बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना, “फडणवीस यांची भेट घेण्याचं नेमकं कारण?” असा प्रश्न विचारला. यावर कंबोज यांनी, “अरे भावा, आज त्याचं अभिनंदन करण्यासाठी मी आलो होतो. ते भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य झाल्याबद्दल मी अभिनंदन करण्यासाठी आलो होतो,” असं उत्तर दिलं. त्यानंतर विरोधी पक्षाचे नेते तुम्ही ईडीचे अधिकारी आहात अशी खोचक टीका करताना दिसत आहेत, असंही कंबोज यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी, “काही हरकत नाही. मी योग्य वेळी उत्तर देईन,” असं म्हटलं.

नक्की पाहा >> Viral Video: आदित्य ठाकरेंच्या भाषणादरम्यान BJP कार्यालयातून भाजपा कार्यकर्ते काढत होते फोटो; ही गोष्ट लक्षात येताच…

राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता तुरुंगात जाणार…
मोहीत कंबोज यांनी मंगळवारी एका ट्वीटमध्ये म्हटलं की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे.” दुसऱ्या एका ट्वीटमध्ये कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी केली होती. संबंधित ट्वीटनंतर मोहीत कंबोज यांच्यावर विरोधी पक्षातील काही नेत्यांनी टीकाही केली आहे.